१७,२१३ रुग्ण करोनामुक्त

मुंबई : मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा ४२ हजारांच्या पलीकडे गेला असला तरी १७,२१३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या उपचार घेत असलेले २३,४०५ (अ‍ॅक्टिव्ह) रुग्ण आहेत. रुग्णसंख्येत धारावीचा वरचा क्रमांक असला तरी उपचाराखाली असलेल्या बाधित रुग्णांची संख्या शीव, वडाळा, कुर्ला, भायखळा आणि अंधेरी परिसरात अधिक आहे.

मुंबईतील रुग्णांची संख्या वाढत असली तरी मोठय़ा संख्येने रुग्ण करोनामुक्त होऊन घरी जात आहेत. मुंबईतील करोना रुग्णांचा आकडा मंगळवापर्यंत ४१,९८६ वर गेला होता, तर आतापर्यंत १३६८ रुग्णांचा करोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे मुंबईत सध्या प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा २३ हजारांपर्यंत आहे.

मुंबईतील एकूण रुग्णसंख्या पाहता सर्वाधिक रुग्ण हे दादर, माहीम, धारावी हा भाग असलेल्या जी उत्तर भागात आहेत. त्याखालोखाल कुर्ला, शीव-वडाळा, भायखळा, अंधेरी पश्चिमचा भाग, वांद्रे पूर्व, लालबाग-परळ यांचा क्रमांक लागतो. मात्र मोठय़ा संख्येने रुग्ण करोनामुक्तदेखील होत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी होत जाते. काही भागात मात्र करोनामुक्तीचा दर कमी असल्यामुळे प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

रुग्ण लवकर सापडल्यास त्याच्या निकट संपर्कातील लोक वेळेवर शोधल्यास संसर्ग वाढण्याचा धोका कमी होतोच, पण बाधित रुग्ण लवकर बरे होतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

रुग्णांची संख्या अशी आहे

११४८  एच पूर्व – वांद्रे पूर्व

१२७३ के पश्चिम – अंधेरी, विलेपार्ले पश्चिम

१४१६ के पूर्व – अंधेरी, विलेपार्ले पूर्व

१४८८ एल – कुर्ला

१४५५ ई – भायखळा, नागपाडा, मुंबई सेंट्रल

१४०९ एफ दक्षिण -परळ,  लालबाग, शिवडी

१२७६ एस – भांडुप, विक्रोळी

१२३० एन – घाटकोपर, विद्याविहार

१५०४ एफ उत्तर – शीव, वडाळा, अ‍ॅण्टॉप हिल