चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची लागण झालेले दोन संशयित रुग्ण मुंबईत आढळले असून, त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. हे दोन्ही संशयित रुग्ण नुकतेच चीनहून परतले आहेत अशी माहिची महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली. कोरोना विषाणुंची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस चीन मध्ये वाढत आहे.

कोरोना विषाणूचा प्रसाररोखण्यासाठी चीनमधील काही शहरे पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने चिंचपोकळीच्या कस्तुरबा रुग्णालयात विशेष कक्ष सुरु केला आहे. कोरोना विषाणुची लागण झालेल्या रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यासाठी हा वॉर्ड बनवण्यात आला आहे अशी माहिती महापालिकेच्या अधिकारी डॉक्टर पद्मजा केसकर यांनी दिली.

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे आढळल्याने खबरदारी म्हणून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे असे पद्मजा केसकर यांनी सांगितले. भारताने खबरदारी म्हणून विमानतळावरच चीन आणि शेजारच्या देशातून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीची व्यवस्था केली आहे.

१० दिवसात चीन बांधणार हॉस्पिटल
घातक अशा कोरेना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीन येत्या दहा दिवसात नवे रुग्णालय उभे करणार आहे. या आजाराचे मुख्य केंद्र असलेल्या वुहान शहरातच हे रुग्णालय उभारण्यात येणार असून, त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. येत्या तीन फेब्रुवारीपासून फक्त कोरोना विषाणुची लागण झालेल्या रुग्णांसाठी या रुग्णालयाचा वापर करण्याचा चीनचा उद्देश आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे नेमके काय होतं?
कोरोना विषाणूने सर्दीपासून श्वसनाच्या गंभीर आजारापर्यंत समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या विषाणूच्या संसर्गाने ताप, कफ, श्वसनात अडथळे अशी लक्षणे दिसत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४४० जणांना या विषाणूची लागण झाली असून त्यांच्यात न्यूमोनियाची लक्षणे दिसत आहेत. आतापर्यंत मध्य चीनमधील हुबेई प्रांतात नऊ बळी या विषाणूने घेतले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे उपसंचालक ली बिन यांनी दिली आहे