मुंबई : मुंबईमध्ये करोना संसर्गावर हळूहळू नियंत्रण मिळत असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी ३६३ दिवसांवर पोहोचला आहे. शनिवारी दिवसभरात ५३६ जणांना करोनाची बाधा झाली, तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला.

धारावीपाठोपाठ शनिवारी दादरमध्ये एकही नवा बाधित रुग्ण सापडला नाही. त्यामुळे दादरमध्येही करोना संसर्गावर नियंत्रण मिळत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये तब्बल दोन लाख ९० हजार ३३६ जणांना करोनाची बाधा झाली असून त्यापैकी दोन लाख ७० हजार १३५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे ४६३ रुग्ण शनिवारी करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

शनिवारी आठ पुरुष आणि चार महिलांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यापैकी १० जणांना दीर्घकालीन आजार होता. तर नऊ जणांचे वय ६० वर्षांहून अधिक होते. आतापर्यंत मुंबईतील ११ हजार ६८ रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ३३१ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी ३३१ करोनारुग्ण आढळून आले. तर, सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या २ लाख ४१ हजार ४७३, तर करोनाबळींची संख्या ५ हजार ९२४ इतकी झाली आहे. भिवंडी शहरात शनिवारी करोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.

१७ कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी

मुंबई : मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता अखंड सेवा दिली. यादरम्यान करोनाची बाधा होऊन काही कर्मचारी मृत्युमुखी पडले. अशा १७ कर्मचाऱ्यांच्या वारसांना मुंबई पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले आहे.

कर्तव्यावर असताना पालिकेतील काही कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आणि यापैकी १८४ जणांचा मृत्यू झाला. करोनाविषयक काम करताना मृत्युमुखी पडणाऱ्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ज्यांना केंद्राकडून मदत मिळू शकणार नाही, त्यांना पालिकेकडून ५० लाख रुपये देण्यात येणार आहेत. केंद्राने मदत नाकारलेल्या मृत पालिका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना पालिकेकडून ५० लाख रुपये मदत आणि वारसांना पालिका सेवेत सामावून नोकरी देण्यात येणार आहे. आतापर्यंत पालिकेने करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या आपल्या ४० कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत दिली असून उर्वरित कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना लवकरच ही रक्कम देण्यात येणार आहे.