‘ऑफलाइन’ लसीकरण करण्याची वेळ; ज्येष्ठ नागरिकांचे हाल

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : करोना लसीकरणाच्या कोविन अ‍ॅपमधील तांत्रिक बिघाड मंगळवारीही कायम राहिल्याने लसीकरण केंद्रावर थेट आलेल्या नागरिकांना लसीकरण करण्याची वेळ आली. त्यामुळे नोंदणीसह लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मंगळवारीही रांगांमध्ये ताटकळत उभे राहावे लागले.

अद्ययावत केलेल्या कोविन-२ अ‍ॅपमध्ये मंगळवारी सकाळपासून तांत्रिक बिघाड होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही लसीकरण वेळेत सुरू होऊ शकले नाही. परिणामी लसीकरणासाठी आलेल्या आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनाही बराच वेळ थांबावे लागले. त्यामुळे केंद्रांमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी निर्माण झाल्याने सुरक्षित अंतर नियमाचा फज्जा उडाला. सोमवारी झालेल्या गोंधळानंतर ऑफलाइन नोंदणी करत नंतर माहिती भरण्याची मुभा दिल्याने मंगळवारी अनेक केंद्रांवर दुपारपासून लसीकरणाचा वेग वाढला.

‘सकाळपासून अ‍ॅप वारंवार बंद पडत होते. परिणामी ज्येष्ठांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ऑफलाइन नोंदणी करून जलदगतीने लसीकरण केले. जेव्हा अ‍ॅप सुरू झाले तेव्हा माहिती भरण्यात आली. त्यामुळे किमान लोकांना खूप काळ थांबावे लागले नाही,’ असे गोरेगाव नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले. सकाळच्या वेळेत अ‍ॅप नीट चालत नसल्याने केंद्राच्या बाहेपर्यंत रांगा लागल्या होत्या. रांगा वाढत असल्याने काही वेळ ऑफलाइन नोंदणी केली. त्यामुळे दुपापर्यंत सर्व सुरळीत झाले. लसीकरण करण्याची प्रक्रिया सोपी आहे, परंतु ज्येष्ठ किंवा सहव्याधी असलेल्या रुग्णांची नोंदणी करण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे केवळ नोंदणी करण्यासाठी चार कर्मचारी नेमण्यात आले असून अन्य त्याची फेरपडताळणी करतात. त्यामुळे लसीकरणचा वेग वाढला असून मंगळवारी जवळपास दोन हजार लाभार्थीचे लसीकरण केल्याची माहिती वांद्रे-कुर्ला संकुलातील करोना केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी दिली.

केंद्रांना कक्ष वाढविण्याची सूचना

लसीकरणाचा वेग वाढविण्याचा दबाव असल्याने मुंबईतील पालिकेअंतर्गत असलेल्या केंद्रांना कक्षांची संख्या वाढविण्याची सूचना पालिकेने दिली. परंतु त्यासाठी आवश्यक लॅपटॉपसह साधनसामग्री मात्र पुरविलेली नाही. त्यामुळे एकीकडे इतक्या कमी वेळात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्यापासून दुसरीकडे साधनसामग्री गोळा करण्यासाठी केंद्रांना धडपडावे लागत आहे.