सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर सोबत त्यांना एक मुखपट्टी विनामूल्य देण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी मुखपट्टीचा वापर आवश्यक आहे. मुखपट्टी न लावता घराबाहेर पडणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येतो. मुंबईतील सर्व २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत मुखपट्टीविना वावरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. मात्र तरीही अनेक नागरिक मुखपट्टी न लावता किंवा मुखपट्टी हनुवटीवर ओढून फिरतात. अशा लोकांकडून दंड वसूल केला जातो. त्यांना मुखपट्टीची आवश्यकतादेखील समजावून सांगितली जाते.

दंड केल्यानंतर नागरिक पुन्हा मुखपट्टी न लावता पुढे जातात. त्यामुळे मुखपट्टी वापराच्या मूळ उद्दिष्टांची पूर्तता व्हावी, यासाठी दंड करण्यासोबत संबंधित नागरिकास एक मुखपट्टीदेखील मुंबई महानगरपालिकेकडून मोफत पुरविली जाणार आहे. मुखपट्टी मोफत दिल्याची नोंद दंडाच्या पावतीवरदेखील केली जाणार आहे.

पालिका आयुक्तांनी १४ ऑक्टोबरला बैठक घेऊन मुखपट्टीविना फिरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयात यासाठी पथके तयार केली. या पथकात पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक याचबरोबर विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे.

मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून दंड ठोठावण्याचे अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसेच क्लीन-अप मार्शलही नियुक्त करण्यात आले आहेत.

१० कोटी दंड वसूल : मुखपट्टीविना आढळलेल्या ४ लाख ८५ हजार ७३७ नागरिकांवर कारवाई करून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत सुमारे १० कोटी ७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.