News Flash

धारावी पॅटर्नची पुन्हा एकदा जागतिक स्तरावर दखल, वॉशिंग्टन पोस्टकडून कौतुक; म्हणाले…

जागतिक आरोग्य संघटनेनंतर वॉशिंग्टन पोस्टकडून धारावी पॅटर्नची प्रशंसा

संग्रहित (PTI)

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीची सध्या जागतिक स्तरावर दखल घेतली जात आहे. करोनाचा फैलाव वेगाने होऊ लागल्याने धारावीमधील परिस्थिती चिंताजनक होत असताना मुंबई महापालिकेने कौतुकास्पद कामगिरी करत करोनवार नियंत्रण मिळवलं आहे. यामुळे धारावी पॅटर्नचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून धारावी मॉडेलची स्तुती करण्यात आल्यानंतर आता वॉशिंग्टन पोस्टनेही धारावीमधील कामगिरीची दखल घेतली आहे.

जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित वृतपत्र असलेल्या वॉशिंग्टन पोस्टने मुंबई महापालिकेने धारावीमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या कामगिरीबद्दल प्रशंसा केली आहे. याआधी त्यांनी मुंबईसहित इतर महत्त्वाच्या शहरांमधील करोनाची माहिती देण्यासाठी दाखवलेल्या पारदर्शकतेबद्दल कौतुक केलं होतं.

वॉशिंग्टन पोस्टने शुक्रवारी ३१ जुलै रोजी धारावी पॅटर्नवर आधारित ‘How a packed slum in Mumbai beat back the coronavirus, as India’s cases continue to soar’ हा लेख प्रसिद्ध केला. धारावीमधील करोनाविरोधातील लढा घनदाट वस्ती असणाऱ्या अनेक शेजारी तसंच खास करुन विकसित देशांसाठी महत्त्वाचा धडा असल्याचं लेखात म्हटलं आहे. “डोक्यावर करोना संकट असताना धारावीने केलेले उपाय, समुदायाचा सहभाग आणि चिकाटी ही दखलपात्र आहे,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारने मुंबईमधील करोना परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी सोपवलेले महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी धारावीमधील यशस्वी कामगिरीसाठी कर्मचाऱ्यांची पाठ थोपटली आहे. डेटानुसार, धारावीमधील १ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला होता. मुंबईत ११ मार्च रोजी पहिला रुग्ण सापडल्याच्या तीन आठवड्यानंतर धारावीत रुग्ण आढळला. पण धारावीत आता फक्त ७२ अॅक्टिव्ह रुग्ण असून २२३५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून डिस्चार्ज देण्यात आला आहे. धारावीमधील ८५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.

याआधी गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेकडून धारावी मॉडेलचं कौतुक करण्यात आलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी मुंबईतील म्हटलं होतं की, “केवळ राष्ट्रीय एकात्मता आणि जागतिक ऐक्यातून या साथीला प्रतिबंध केला जाऊ शकतो. जगात अशी अनेक उदाहरणे आहेत की महामारी अत्यंत गंभीर अवस्थेत असली तरीही ती पुन्हा नियंत्रित केली जाऊ शकते. इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि धारावी (मुंबई) जो जास्त लोकसंख्या असलेला भाग आहे ही याची काही उदाहरणं आहेत. सर्वांना सामील करणं, चाचणी करणे, रुग्णांचा शोध घेणं, त्यांचं अलगीकरण करणं हे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि करोनावर विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचं आहे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 2:46 pm

Web Title: coronavirus washington post praises bmc efforts on dharavi model sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 समुद्रात गणेश विसर्जनावर बंदी घाला
2 दृष्टिहिनांसाठी ‘व्हिजन बियॉण्ड’ची निर्मिती
3 प्रतिजन चाचणीचे नकारात्मक अहवाल २३ टक्के सदोष
Just Now!
X