दुबईहून प्रवास करून देशात परतलेल्या ६३ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी सकाळी कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. थेट संपर्कात आल्यामुळे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाची पत्नी आणि मुलगा यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचेही डॉ. शाह यांनी सांगितले.

मुंबईतील ६३ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याचे त्याच्या या दोन्ही कुटुंबीयांना सांगण्यात आले. विलगीकरण कक्षामध्ये असलेल्या दोन जणांना त्यांना पाहता आले. मात्र अन्य जवळील आणि मोजक्याच नातेवाईकांना काचेच्या आवरणातून त्यांचा चेहरा दिसेल अशी सुविधा करण्यात आली होती. हा मृतदेह पूर्णपणे बंदिस्त करण्यात आला होता, संसर्ग पसरणार नाही, याची काळजी घेतली गेली असल्याचे पालिकेचे उपायुक्त डॉ. सुरेश काकाणी यांनी सांगितले. त्यांच्या कुटुंबीयांनी सूचित केलेल्या दादर येथील स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनीमध्ये मृतदेहाचे दहन करण्यात आले.

करोनानं मृत्यू झालेल्या ज्येष्ट व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा दीर्घकालीन आजार होता. या रुग्णाचा न्यूमोनियासह हदयामध्ये संसर्ग झाल्याने मृत्यू झाल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. करोनाचा देशातील हा तिसरा बळी असून याआधी कर्नाटक आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.

दुबईहून ५ मार्चला हा रुग्ण देशात परतला होता. ७ मार्चला त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. हृदयविकार असल्याने कुटुंबीयांनी त्यांना माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी नेले. ८ मार्चला हिंदुजामध्ये दाखल केले. तपासण्यांमध्ये श्वास घेण्याचा त्रास हा विषाणू संसर्गामुळे होत असल्याचा संशय आल्याने त्यांचे नमुने १२ मार्चला कस्तुरबामध्ये पाठवण्यात आले. चाचण्यांमध्ये करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना १३ मार्चला कस्तुरबामध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले.

कस्तुरबामध्ये रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवले होते. त्यांची प्रकृती सुधारत असल्याने अधूनमधून कृत्रिम श्वसनयंत्रणा काढण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यांना उच्चरक्तदाबासह हृदयविकारही होता. तसेच न्यूमोनिया आणि हृदयाला संसर्ग झाला होता. हृदयाला सूज आल्याने आणि ठोके वाढल्याने सोमवारी संध्याकाळी प्रकृती गंभीर होत गेली. मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पालिकेच्या उपकार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.