लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासानंतर कु टुंबकबिला आणि सामानसुमानासह फलाटावर उतरलेल्या प्रवाशांना वैद्यकीय तपासणी आणि करोना चाचणीचे सोपस्कार उरकू न घर गाठताना मनस्तापाला तोंड द्यावे लागत आहे. एकाच वेळी हजारो प्रवाशांची तपासणी, काहींकडील करोना चाचणी अहवाल तपासणे आणि त्यात एखादा प्रवासी नजर चुकवून जात असल्यास त्याला गाठून, तपासणी करून पाठवणी करताना अपुऱ्या पालिका आणि रेल्वे मनुष्यबळाचीही दमछाक होत आहे.

दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी ९६ तास आधी करोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ज्यांच्याकडे अहवाल नाही, त्यांची रेल्वे स्थानकात उतरल्यावर तपासणी केली जात असून लक्षणे आढळल्यास त्वरित प्रतिजन चाचणी करण्यात येत आहे. मुंबईत पश्चिम रेल्वेवर दररोज ४० गाडय़ा येतात. यात दिल्ली, गुजरात, राजस्थान येथून येणाऱ्या गाडय़ांची संख्या लक्षणीय आहे. या गाडय़ांमधून उतरणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी दादर, मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरिवली स्थानकांत पालिकेकडून आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकावर प्रवाशांचे तापमान मोजणे, जलद प्रतिजन चाचणी करणे आदी जबाबदारी आहे. तपासणी झालेल्या प्रवाशांच्या हातावर शिक्का किंवा खूण करणे, एखादा प्रवासी करोनाबाधित नसेल तर त्याच्या हातावर ‘एन’ असे नमूद केले जात आहे.

दादर स्थानकात असे पाच कक्ष (कॅ म्प) आहेत. यातील प्रत्येक कॅ म्पवर तीन ते चार कर्मचारी असले तरी मोठय़ा संख्येने येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करताना त्यांची दमछाक झाली. या पथकाच्या मदतीला रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारीही आहेत.

बुधवारी सकाळी दादर स्थानकात आलेल्या सौराष्ट्र मेलमधील १७५ जणांना तपासण्यात आले. यामध्ये १३ प्रवाशांकडे आधीच करोना चाचणी अहवाल होता. अन्य प्रवाशांचे तापमान मोजले गेले. ज्या प्रवाशांना सर्दी, खोकल्यासारखा त्रास होता अशांची प्रतिजन चाचणी केली गेली. यातील एक प्रवासी चाचणीनंतर करोनाबाधित निघाला. अशा बाधितांना त्वरित घरी किंवा करोना केंद्रात विलगीकरणात राहण्याची सूचना करण्यात येत आहे. त्यानंतर अजमेर-दादर गाडीतून आलेल्या प्रवाशांचीही             चाचणी केली गेली. नजर चुकवून जाणाऱ्या प्रवाशांनाही अडवून तपासणी के ली गेली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.

एकही करोनाबाधित नाही

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर बुधवारी पहिल्या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहा गाडय़ांमधून दाखल झालेल्या ३४०० प्रवाशांची करोना लक्षणांची तपासणी (स्क्रीनिंग) केली, तर पालिकेने नेमलेल्या दोन लॅबद्वारे २२५ संशयित प्रवाशांची प्रतिजन चाचणी करण्यात आली. यात एकाही प्रवाशाला करोनाची लागण झाली नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ४९५ प्रवाशांनी त्यांचे आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दाखविल्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बोरिवलीत एकच करोनाबाधित

बोरिवली रेल्वे स्थानकात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत २००० प्रवासी बाहेरगावाहून आले. त्यापैकी दहिसरच्या एका प्रवाशाला करोनाची लक्षणे असल्याने त्याची चाचणी करण्यात आली. त्यात संबंधित प्रवासी करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला बोरिवली येथील करोना केंद्रात पाठवण्यात आले. बोरिवली पूर्वेला असलेल्या दहा क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर बाहेरगावाहून येणाऱ्या गाडय़ा लागतात. येथून पूर्वेला बाहेर पडण्याच्या मार्गावर तपासणी पथक बसले होते, परंतु पूल चढून पश्चिमेला बाहेर पडणाऱ्या प्रवाशांसाठी पश्चिमेच्या मार्गावर पथक बसवण्यात आले नव्हते.

दादरमध्ये १ बाधित

पालिकेच्या जी उत्तर कार्यालयाने दादर स्थानकावर आपली यंत्रणा उभी केली होती. त्यात पाच डॉक्टर, २० प्रयोगशाळा तंत्रज्ञ व १८ पॅरामेडिकल कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला होता, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. दादर स्थानकावर सकाळी साडेसहा वाजता सौराष्ट्र मेलने ३५० प्रवासी आले. तर ११.५४ ला बिकानेर-दादर गाडीने ७५० प्रवासी आले. १.४८ मिनिटांनी भूज-दादर गाडीने ९०० प्रवासी आले. या सर्व २००० प्रवाशांची तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर २४९ प्रवाशांची प्रतिजन चाचणी करण्यात आली. त्यापैकी सौराष्ट्र मेलने आलेला एक प्रवासी बाधित आढळला असून त्याला गृह अलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

वांद्रय़ात एकाच वेळी तीन गाडय़ांची गर्दी

वांद्रे टर्मिनसवर सकाळी ११ ते ११.३० दरम्यान भुज आणि सूर्यनगरी एक्स्प्रेस एकामागोमाग येताच प्रवाशांची मोठी गर्दी झाली. त्याच वेळी डाऊनला जाणाऱ्या सूर्यनगरी आणि पश्चिम एक्स्प्रेसही आल्याने प्रवाशांची तोबा गर्दी झाली. त्यात चाचण्यांसाठी भुयारी मार्गापर्यंत लांबच लांब रांग लागलेल्या. महिला, लहान मूल, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यानाच सामानसुमानासह रांगेत ताटकळावे लागल्याने प्रचंड मनस्ताप झाला. त्यात शारीरिक अंतराचा फज्जा उडाल्याचे दिसत होते. रेल्वे पोलिसांना बघ्याची भूमिका घेण्यापलीकडे काहीच करता येत नव्हते. अखेर गर्दी पाहता रेल्वे कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आणि पालिके चे तपासणी कॅ म्प वाढविण्यात आले. मुंबई सेंट्रल स्थानकात करोनाचा धोका सर्वाधिक असलेल्या गटातील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती आणि करोनाची लक्षणे आढळून येणाऱ्यांची प्रतिजन चाचणी करण्यात आली, तर उर्वरित प्रवाशांना कोणतीही लक्षणे नसल्याची खातरजमा करून घरी सोडण्यात आले.

प्रवाशांकडून चाचणी शुल्क आकारणी नाही

प्रतिबंधित राज्यातून प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांकडून करोना चाचणीचे शुल्क आकारले जाणार अथवा नाही याबाबत मंगळवापर्यंत कोणतीच स्पष्टता नव्हती. मात्र बुधवारी मुंबई सेंट्रल स्थानकावर प्रवाशांची विनामूल्य प्रतिजन चाचणी करण्यात आली.