प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य पुरवठा करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही धान्य मिळणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दोन महिने या गरीबांची दैन्यावस्था केल्यानंतर व बहुसंख्य आपल्या गावी परतल्यावर आज फुकट धान्याची घोषणा झाली, असंवेदनशीलता याला म्हणतात अशा शब्दांत टीका केली आहे.

सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “महाविकास आघाडी सरकारने जनतेला वाटून उरलेले धान्य माफक दरात स्थलांतरित मजूरांना देण्याकरिता केंद्राकडे विनंती केली. पण केंद्राने परवानगी दिली नाही. दोन महिने या गरीबांची दैन्यावस्था केल्यानंतर व बहुसंख्य आपल्या गावी परतल्यावर आज फुकट धान्याची घोषणा झाली. असंवेदनशीलता याला म्हणतात”.

प्रति महिना ५ किलो धान्य गरीबांना दिलं जाणार आहे असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. याचा फायदा आठ कोटी प्रवासी मजुरांना होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. वन नेशन आणि वन रेशन कार्ड ही योजनाही येत्या काळात आम्ही आणतो आहोत. ज्यामुळे उद्या असं काही संकट आलं तर गरीबांना देशातल्या कोणत्याही रेशन डेपोमधून धान्य उपलब्ध होऊ शकेल असंही स्पष्ट करण्यात आलं.

स्थलांतरित मजुरांची केंद्र सरकारला काळजी आहे. आम्ही त्यांच्यासाठी निवारा केंद्र उभारली आहेत. तसंच त्यांच्या जेवणाची सोय केली आहे. त्यांच्या आरोग्य चिकित्सेचीही सोय केली आहे असं आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. या सगळ्या गोष्टी मागील दोन महिन्यात करण्यात आल्या आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. १२ हजार बचतगटांकडून ३ कोटी मास्क आणि दीड लाख लीटर पर्यंत सॅनिटायझरची निर्मिती केली आहे असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. गेल्या दोन महिन्यात ७ हजार २०० बचतगटांची स्थापना झाली आहे असंही स्पष्ट करण्यात आली आहे. स्थलांतरित मजुरांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं.