मुंबईत लागू केलेल्या पाणी कपातीमुळे व्याकुळ झालेल्या सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांनी पाऊस पडावा यासाठी स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत गणरायाला गाऱ्हाणे घातले, तर समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांनी अल्लाला विनंती केली. भविष्यातील नियोजनासाठी लागू करण्यात आलेल्या २० टक्के पाणी कपातीवरुन सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. पाऊस पडलाच नाही तर कोणत्या उपाययोजना करणार असा प्रश्न उपस्थित करून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले आणि तब्बल अडीच तास निर्थक चर्चा करीत वेळ वाया घालवला.

गेले तीन दिवस घाटकोपरमध्ये काही भागात पाणी नसल्यामुळे काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांनी थयथयाट करीत पाणीपुरवठय़ाबाबत अहवाल सदर करण्याची मागणी केली. रेन वॉटर हार्वेस्टिंग किती इमारती, शाळा, रुग्णालयांमध्ये केले; रेन वॉटर हार्वेस्टिग न केलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र का देण्यात आले; विहिरी, कूपनलिकांची सफाई केली का अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करीत नगरसेवकांनी प्रशासनाला भंडावून सोडले. तर पाण्याबाबत श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे या नगरसेवकांच्या प्रश्नांची उत्तरे देत होत्या. परंतु त्याबद्दल असमाधान व्यक्त करीत नगरसेवकांनी गोंधळ घातला.