प्रवासी रोडावल्याने तोटय़ात चाललेला ‘बेस्ट’ उपक्रम सावरण्यासाठी कर्ज आणि आर्थिक मदतीचे खांब उभे केले जात असताना घाटकोपर ते अंधेरीदरम्यान सेवा चालवणाऱ्या ‘मेट्रो वन’ने प्रवासी वाढवण्यासाठी सवलती आणि सुविधांच्या पायघडय़ा अंथरल्या आहेत. घाटकोपर ते अंधेरीदरम्यानच्या एक हजारहून अधिक गृहनिर्माण संस्थांतील रहिवासी आणि साडेचारशेहून अधिक कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना मोफत मेट्रो फेरी, घरपोच व कार्यालयात मासिक पास पुरवणे अशा योजना मेट्रोने आखल्या आहेत.

घाटकोपर-वर्सोवा या मेट्रो-१ मार्गाला सुरुवातीपासूनच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अंधेरी रेल्वे स्थानक ते साकीनाका या परिसरात पूर्वीपासून असलेल्या कंपन्यांच्या संख्येत मेट्रो-१ मार्गिका सुरू झाल्यापासून वाढ झाली आहे. त्यामुळेही घाटकोपर रेल्वे स्थानक आणि अंधेरी रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या मार्गिकेवर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. २०१७-१८ या कालावधीत या मार्गिकेवरील प्रवासी संख्येमध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या या मार्गावर दररोज सुमारे साडेतीन लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता दररोजच्या ३७८ फे ऱ्यांमध्ये वाढ करून त्या ३८६ करण्यात आल्या आहेत. मात्र प्रवाशांची संख्या आणखी वाढण्यासाठी आणि प्रवासी बांधून ठेवण्यासाठी मेट्रो प्रशासन सध्या प्रयत्न करत आहे.

मेट्रो वाहतूक सुरू  झाल्यापासून अंधेरी ते साकीनाका या टप्प्यात वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता प्रशासन येथील ४५० कंपन्यांशी संवाद साधत आहेत. त्यातील तीन कंपन्यांमधील २००हून अधिक कर्मचाऱ्यांना मासिक पास योजनेत सामावून घेण्यात आले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना थेट कार्यालयामध्येच मासिक पास उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामुळे या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना पासच्या नूतनीकरणासाठी रांगेत उभे राहावे लागत नाही. आकडेवारीनुसार मेट्रो-१च्या स्थानकांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्वात जास्त प्रवाशांची संख्यी ही अंधेरी ते साकीनाका या टप्प्यात आहे. या स्थानकादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत २३ टक्क्यांनी वाढली आहे. या टप्प्यात गेल्या वर्षी सर्वसाधारण आठवडय़ात ३२,४४८ प्रवासी प्रवास करत होते, तर यंदा ३९,९०८ प्रवासी प्रवास करतात.

मेट्रो स्थानकाच्या परिसरातील सुमारे एक हजार गृहनिर्माण संस्थांशी मेट्रो-१ने संबंध प्रस्थापित   केले आहेत. या गृहनिर्माण संस्थांमध्ये मेट्रोची पहिली आणि शेवटची फेरी तसेच विविध उपक्रमांची माहिती दिली जाते. शिवाय हरविलेल्या वस्तू केंद्राच्या माध्यमातून मेट्रो स्थानक किंवा गाडय़ांमध्ये ग्राहकांच्या हरविलेल्या वस्तू त्यांना पुन्हा देण्याच्या प्रयत्न करण्यात येत आहे. या माध्यमातून आजवर ६० टक्के वस्तू संबंधितांना परत करण्यात आल्या आहेत.

‘नवीन प्रवाशांना आकर्षित करण्यासह जुन्या प्रवाशांना बांधून ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रवास करणाऱ्यांमध्ये या पट्टय़ातील कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यासाठी विविध योजना अमलात आणल्या जात आहेत,’ अशी माहिती ‘मेट्रो १’च्या प्रवक्त्याने दिली.