साहित्यक्षेत्राला अधिकाधिक अधिकाधिक प्रेरणा, बळकटी आणि व्यापक स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी साहित्यिकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना खासगी क्षेत्रातूनही पुरस्कार दिले गेले पाहिजेत. आपल्याकडे साहित्यासाठी सरकारी स्तरावरच पुरस्कार दिले जातात. त्या पुरस्कारांमागे राजकीय दबाव किंवा अन्य हेतू असतो. जागतिक स्तरावर जसे नोबेल, बुकरसारखे पुरस्कार दिले जातात त्याच धर्तीवर आपल्याकडेही वेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून जास्तीत जास्त पुरस्कार दिले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केले.
‘भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाऊंडेशन’ या जळगाव येथील संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या या वर्षीच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा रविवारी करण्यात आली. डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कारांची निवड केली असून प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नेमाडे यांनी ही नावे जाहीर केली. ‘बहिणाई पुरस्कारा’साठी सवरेत्कृष्ट लेखिका म्हणून मलिका अमर शेख यांची निवड करण्यात आली आहे. ‘बालकवी ठोमरे पुरस्कारा’साठी सवरेत्कृ ष्ट कवी म्हणून वसंत दत्तात्रेय गुर्जर यांची, तर सवरेत्कृष्ट गद्यलेखक म्हणून ‘ना. धों. महानोर पुरस्कारा’साठी भास्कर चंदनशिव यांची निवड करण्यात आली आहे. जळगावमध्ये जैन हिल्स येथील गांधीतीर्थ सभागृहात ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सोहळ्यात हे पुरस्कार वितरित करण्यात येणार असून सन्मानचिन्ह, गौरवपत्र, एक्कावन्न हजार रुपये रोख, शाल-श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
गेली कित्येक वर्षे ‘भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाऊंडेशन’ आणि ‘बहिणाई मेमोरिअल ट्रस्ट जळगाव’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कारांसाठी साहित्यिकांची निवड करताना वेगवेगळ्या स्तरांतील ४०० ते ५०० लोकांकडून शिफारशी मागवल्या जातात. आलेल्या शिफारशींची छाननी करून लोकप्रिय साहित्यिक आणि कसदार साहित्याची निर्मिती करणारे साहित्यिक यांमध्ये सुवर्णमध्य काढून हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांच्या निवडप्रक्रियेत पारदर्शीपणा असतो आणि अशा प्रकारचे जास्तीत जास्त पुरस्कार साहित्यिकांसाठी दिले गेले पाहिजेत, असे नेमाडे यांनी या वेळी सांगितले.