लहान-मोठे रस्ते, चौक, टी जंक्शन आदींचे आग्रहाने नामकरण करण्यात व्यस्त असणाऱ्या नगरसेवकांचा डोळा आता ठिकठिकाणच्या अग्निशमन केंद्रांवर आहे. विभागाच्या नावांनी परिचित असलेल्या अग्निशमन केंद्रांना ऐतिहासिक व्यक्तींची नावे देण्याची मागणी नगरसेवक करू लागले आहेत. भाजप नगरसेवकांनी तर ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी पुढे रेटण्याचा प्रयत्न चालविला आहे.
छोटे-मोठे रस्ते, चौक आणि टी जंक्शनला स्थानिक समाजसेवकांची नावे देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. नगरसेवक यासाठी आग्रही असल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील अग्निशमन दलाची केंद्रे विभागाच्या नावाने प्रसिद्ध आहेत. या अग्निशमन केंद्रांचेही नामकरण करण्याचा आग्रह आता नगरसेवक धरू लागले आहेत. अग्निशमन दलाच्या केंद्रांच्या नामकरणासाठी मार्गदर्शक तत्वे ठरविण्याची आणि त्याच अवलंब करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. ही ठरावाची सूचना १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पालिका  सभागृहाच्या सभेत सादर होणार आहे. पालिका सभागृहाने मंजुरी दिल्यास ही ठरावाची सूचना अभिप्रायासाठी पालिका आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे.