समाजमाध्यमातून करोनाविषयी चुकीची माहिती वा संदेश प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा पोलिसांचा आदेश योग्यच आहे, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. करोनाविषयीच्या चुकीच्या माहितीपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी हा आदेश महत्त्वाचा असल्याचेही नमूद करत या आदेशाला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला.

समाजमाध्यमांतून करोनाविषयी चुकीची माहिती वा संदेश प्रसिद्ध करणाऱ्यास मज्जाव करणारा आदेश पोलिसांनी १० एप्रिलला काढला होता. या आदेशाविरोधात पंकज राजमाचिकर यांनी याचिका आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांचा हा आदेश सध्याच्या करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लोकांचे चुकीची माहिती आणि संदेशापासून संरक्षण करण्यासाठी आहे, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी अंतरिम दिलासा देण्यास नकार नकार दिला.