कुरार पोलीस ठाण्यात ‘पोलीस निरीक्षक’ या पदावर काम करणाऱ्या संजय सावंत या पोलीस अधिकाऱ्यानेच एका प्रकरणात १४ लाख रुपयांची लाच मागितली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. कुरार पोलीस ठाण्यात एका महिलेच्या पतीविरुद्ध फिर्याद दाखल झाली होती. या गुन्ह्यचे तपास अधिकारी म्हणून सावंत काम पाहात होते. दाखल झालेल्या गुन्ह्यातून पतीची सुटका करण्यासाठी सावंत यांनी ही लाच मागितली होती, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.संबंधित महिलेने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात सावंत यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

मुंब्य्रात पाच दुचाकींची जाळपोळ
खास प्रतिनिधी, ठाणे</strong>
ठाणे येथील पाचपखाडी भागात चार रिक्षांसह आठ वाहने जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडलेली असतानाच मुंब्य्रातील शिमला पार्क परिसरात बुधवारी पहाटे सात दुचाकींना आग लावण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत पाच दुचाकी जळून खाक झाल्या असून, उर्वरित दोन दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले आहे.
या दुचाकींना गर्दुल्ल्यांनी नशेमध्ये आग लावल्याचा संशय मुंब्रा पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. के. तायडे यांनी दुचाकींच्या जाळपोळप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगितले.