पिंपरी-चिंचवडचे ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या दोन दिवसांवर आले असताना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून महामंडळाचे अध्यक्ष, संमेलनाध्यक्ष निवडणूक अधिकारी आणि नियोजित संमेलनाध्यक्षांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काही साहित्यिक आणि प्रकाशकांनी केली. मुंबईत पोलिसांत तक्रार अर्जही दाखल करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.

यंदा झालेल्या संमेलनाध्यक्ष निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून मतपत्रिका बदलणे, फाडणे आणि खोटी कागदपत्रे तयार करणे असे प्रकार घडले असल्याचा दावा या साहित्यिकांनी केला आहे. संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, संमेलनाध्यक्ष निवडणुकीचे निवडणूक अधिकारी अ‍ॅड. प्रमोद आडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मुरलीधर साठे, ‘अनुबंध प्रकाशन’संस्थेचे अनिल कुलकर्णी आणि ‘डिंपल पब्लिकेशन’चे अशोक मुळ्ये यांनी दाखल केलेल्या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. गिरगावातील वि. प. मार्ग पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनावर विश्वास पाटील यांच्यासह  भारत सासणे, राजन खान, डॉ. महेश केळुस्कर, अरुण म्हात्रे, सुहास सोनवणे, अ‍ॅड. सतीश गोरुडे, मुकुंद आवटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.