सोयीसुविधांनी सुसज्ज ‘कोस्टा क्रूझ’ची मुंबई बंदरात दाखल

आलिशान सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या ‘कोस्टा निओ क्लासिक’ या आंतराष्ट्रीय दर्जाच्या ‘क्रूझ’चे मुंबई पोर्ट ट्रस्ट बंदरात आगमन झाले आहे. भारतातील समुद्र पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील चार महिन्यांसाठी मुंबई हे ‘कोस्टा क्रूझ’चे गृहबंदर (होम पोर्ट) राहणार आहे. कोस्टा क्रुझने मुंबई-कोचिन-मालदीव अशी सर करण्याची संधी भारतीय पयर्टकांना मिळेल.

येत्या रविवारपासून या सफरीला सुरुवात होणार आहे. मार्च २०१८ पर्यंत आठवडय़ाच्या एक रविवारी हे जहाज मुंबई ते मालदीव प्रवासासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या बंदरातून रवाना होईल. मुंबई ते कोचिन या चार दिवसांच्या प्रवासासाठी ३० हजार रुपये, तर मुंबई ते मालदिव या सात दिवसांच्या प्रवासासाठी पर्यटकांना ४५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. बाराशे लोकांच्या राहण्याची क्षमता असणाऱ्या या जहाजात ६५४ खोल्या तसेच समुद्राचे विस्तीर्ण दृश्य दाखविणाऱ्या स्वतंत्र्य सज्जाच्या खोल्या देखील आहेत. तसेच चित्रपटगृह, मनोरंजन सभागृह आणि १३०० चौरस मीटरमध्ये पसरलेली व्यायामशाळा आहे. करमुक्त खरेदी केंद्र, वैविध्यपूर्ण पुस्तकांचा संग्रह असलेले सुसज्ज वाचनालयही जहाजामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय इटालियन पद्धतीच्या खाद्यपदार्थाचा आस्वाद पर्यटकांना घेता येणार आहे.

मुंबई बंदराला ‘क्रूझ टर्मिनल’ म्हणून विकसित करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच, क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी बंदराचे प्रशुल्क ४२ टक्यांनी कमी करण्यात आल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी दिली. क्रूझ पर्यटनाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात परकीय चलन आणि रोजगाराची संधी निर्माण होणार असल्याचे राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.