शैलजा तिवले

देशात करोनाच्या स्थानिक संसर्ग प्रसाराचा टप्पा सुरू झाला असल्याचे केंद्र सरकारने कितीही नाकारले असले तरी हा टप्पा सुरू झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले असून एक रुग्णाची नोंदही २० मार्च अहवालात केली आहे.

दिल्ली, पुणे, मुंबई आणि नागपूर येथे आढळलेल्या काही रुग्णांनी कोणताही प्रवास केलेला नाही आणि करोनाबाधित रुग्णांशी त्यांचा थेट संपर्क आला नाही. तरीही त्यांना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे.

चीनमधील करोना विषाणूच्या प्रसारवरून तीन टप्पे असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. याचा पहिला टप्पा म्हणजे परदेशातून आलेल्या प्रवाशांना करोनाचे संसर्ग होणे. देशातील हा टप्पा ३० जानेवरीलाच सुरू झाला होता. राज्यात ९ मार्चला पहिला रुग्ण आढळला.

या प्रवाशांच्या संपर्कामध्ये आलेल्यांना बाधा होणे हा दुसरा टप्पा. मार्चच्या पहिल्याच आठवडय़ात हा टप्पा देशात सुरू झाला. तिसरा टप्पा म्हणजे स्थानिक लोकांमार्फत पसरणारा संसर्ग.

पुणे, दिल्लीमध्येही अशाच प्रकारे संसर्ग पसरल्याचे नोंदले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही देश स्थानिक संसर्ग प्रसारच्या टप्प्यामध्ये असल्याचे ‘लोकसत्ता’ने ई मेलद्वारे साधलेल्या संवादामध्ये सांगितले आहे. देशात एक रुग्णही आशा प्रकारे स्थानिक संसर्ग प्रसाराने बाधा आल्याचे संघटनेच्या २० मार्चच्या अहवालात नोंदले असल्याचेही स्पष्ट केले आहे.

मलेरियाची औषधे प्रतिबंधात्मक उपाय नाहीत!

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हायड्रोक्सि  क्लोरोक्वीन ही मलेरियाची औषधे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्येष्ठ नागरिकांना घ्यावीत, असे संदेश समाजमाध्यमावर फिरत आहेत. सध्या तरी या संसर्गावर कोणतेही औषध प्रभावशाली असल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. जगभरात एचआयव्ही, मलेरियावरील औषधांच्या वैदय़कीय चाचण्या सुरू आहेत. परंतु ही औषधे उपचार पद्धतीचा भाग असून प्रतिबंधात्मक नाहीत, असेही जागतिक आरोग्य संघटनेचे प्रसारमाध्यम अधिकारी अँद्राय म्युचिनिक यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.