मुंबई : कतार पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीप्रकरणी अटक केलेले मोहम्मद शरीक आणि ओनीबा कुरेशी हे दाम्पत्य उद्या, बुधवारी रात्री मुंबईत परतणार आहे.

सन २०१९ मध्ये हे दाम्पत्य मधुचंद्रासाठी कतारला गेले होते. त्यांच्या सामानात ४१ किलो अमली पदार्थ सापडल्याने तेथील पोलिसांनी या दाम्पत्यास अटक केली. तेथील न्यायालयाने या दाम्पत्यास दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षाही ठोठावली. दरम्यान, शरिकची आत्या तबस्सुम कुरेशी हिने भेटवस्तू आड अमली पदार्थ या दाम्पत्याकडे सोपवला. तबस्सुम आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कर टोळीची सक्रिय सदस्य होती, याबाबतचे पुरावे ओनीबाच्या वडिलांनी एनसीबी प्रमुख राकेश अस्थाना यांच्याकडे सुपूर्द केले. अस्थाना यांनी ओनीबाच्या वडिलांनी दिलेल्या पुराव्यांची खातरजमा केली. त्यात तथ्य आढळले. तबस्सुमसह तिच्या साथीदारांना अटक केली गेली. तबस्सुमने गुन्हा कबूल केला.

अस्थाना यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून या प्रकरणातील वास्तव कतार प्रशासनासमोर ठेवले. शरीक, ओनीबा यांना निदरेष मुक्त करून मायदेशी पाठवावे, यासाठी अस्थाना यांनी बरीच खटपट केली. ३० मार्चला कतार न्यायालयाने या दाम्पत्यास निदरेष मुक्त करत भारतात पाठवण्याचे आदेश दिले. दोन वर्षे हे दाम्पत्य कारागृहात राहिले. या कालावधीत ओनीबाने मुलीस जन्म दिला.