घराण्याच्या खोटय़ा प्रतिष्ठेपायी जिवाला धोका होण्याच्या भीतीने पुण्याहून मुंबईला पळून आलेल्या नवदाम्पत्याला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अंतरिम संरक्षण दिले. या जोडप्याविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले.
न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती रेवती ढेरे यांच्या खंडपीठासमोर या दाम्पत्याने केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात आली. मात्र पुणे पोलिसांशी संपर्क होऊ शकलेला नाही आणि त्यामुळे नेमकी काय परिस्थिती आहे हे कळू शकलेले नाही, असे सरकारी वकिलांनी सांगितल्यावर न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी १८ नोव्हेंबपर्यंत तहकूब केली. परंतु मुलीच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एवढेच नव्हे, तर मुलीविरुद्ध ८० लाख रुपये घेऊन पळाल्याचीही खोटी तक्रार नोंदविण्यात आली. त्यामुळे दोघांच्या जिवाला धोका असण्यासोबतच पोलिसांकडूनही त्यांच्यावर कारवाई होण्याची भीती त्यांचे वकील अ‍ॅड्. महेश वासवानी यांनी न्यायालयाकडे व्यक्त केली. तसेच दोघांनाही सोमवारच्या सुनावणीपर्यंत अंतरिम संरक्षण देण्याची विनंती केली. त्याची दखल घेत दाम्पत्याविरुद्ध कुठलीही कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना बजावत अंतरिम संरक्षण दिले.
हे नवदाम्पत्य पिंपरी येथे राहते. तरुणी शीख तर तरूण सिंधी समाजातील असल्याने दोघांनी घरच्यांचा विरोध डावलून घरातून पळून जात ३० ऑक्टोबर रोजी नाशिक येथे विवाह केला. त्यामुळे तरुणीच्या वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. तसेच पोलिसांनी तरुणाच्या आईवडिलांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले असता तरुणीचे वडील आणि नातेवाईकांनी दोघेही सापडल्यास तेथेच त्यांना ठार केले जाईल, असे धमकावले. आम्हाला ठार करण्याच्या उद्देशानेच आमचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. एवढेच नव्हे, तर आपण घरातून पैसे आणि दागिने पळविल्याची खोटी तक्रारही वडिलांनी केल्याने पुणे पोलीसही आपल्या शोधात असल्याचे तरुणीने याचिकेत म्हटले आहे.
त्यामुळे या ‘ऑनर किलिंग’पासून आम्हाला संरक्षण द्यावे, अशी विनंती या दाम्पत्याने याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली आहे.