घरच्यांच्या विरोधामुळे टोकाचे पाऊल

गेल्या आठवडाभरापासून घरातून बेपत्ता असलेल्या प्रेमी युगुलाचे मृतदेह बुधवारी पहाटे मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाच्या आवारातील एका कारमध्ये आढळले. या दोघांनी विषप्राशन करून गाडीतच आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. भिन्न धर्माचे असल्याने या दोघांच्या विवाहाला त्यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता, अशी माहितीही पुढे येत आहे.

सलमान अफरोज आलम खान (२६) आणि मनीषा नेगी (२१) अशी दोघांची नावे आहेत. सलमान मुलुंड पश्चिमेकडील अशोक नगर येथे तर मनीषा नवी मुंबईतील दिघा येथे राहत होती. सलमान आणि मनीषा भांडुपच्या महाविद्यालयात शिकले. गेल्या चार वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्याबाबत दोघांच्याही पालकांना माहिती होती. मात्र धर्म भिन्न असल्याने पालकांना हे संबंध अमान्य होते. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून दोघे घरी गेले नव्हते. दोघांमधील प्रेमसंबंधांबाबत माहिती असल्याने ते परस्पर लग्न करतील, या अंदाजाने खान, नेगी कुटुंबाने हरविल्याची तक्रार दिली नव्हती.

मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाच्या आवारात बुधवारी पहाटे आवारात निळ्या रंगाच्या कारमध्ये या दोघांचे मृतदेह आढळले. गाडीत कपडय़ांनी भरलेली बॅग, छायाचित्रे, कागदपत्रे आणि विषारी द्रव्याची रिकामी बाटली आढळली. दोघांच्या तोंडातून फेस येत होता. मृतदेह शवचिकित्सेसाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात धाडण्यात आले. ज्या कारमध्ये मृतदेह आढळले ती खान कुटुंबाची आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी सुरू केल्याचे साहाय्यक आयुक्त अनिल वलझाडे यांनी सांगितले.