मराठीत बोल, अशी सूचना केल्याने कुरिअर घेऊन आलेल्या तरुणाने दादरमध्ये राहणाऱ्या दोन महिलांना शिवीगाळ, मारहाण केली. या महिलांनी शेजाऱ्यांच्या मदतीने या तरुणाला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला अटक केली.

शिवाजी पार्क पोलिस ठाणे आणि शिवसेना भवनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुरुकृपा इमारतीत ही घटना घडली. या इमारतीमध्ये सुजिता पेडणेकर आणि विनीता पेडणेकर या दोघी राहतात. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कुरियर घेऊन आलेल्या कुरियर बॉयला या युवतींनी मराठीत संवाद साधण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने या तरुणाने शिवीगाळ करत एका युवतीच्या चेहऱ्यावर पेनाने वार केला तर, दुसरीच्या डोक्यात ठोसा लगावला.

न. चिं. केळकर मार्गावरील गुरुकृपा इमारतीत राहणाऱ्या सुजिता, विनीता पेडणेकर यांच्यासोबत शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रसंग घडला. शिवाजी पार्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फोरम कुरिअर एजन्सीतील इब्राहिम शेख (२८) याने समर्थ व्यायाम मंदिराची पुस्तिका देण्यासाठी पेडणेकर यांच्या घराचे दार ठोठावले. सुजिता (४८) यांनी दार उघडले. शेखने त्यांच्याशी हिंदीत संवाद साधला. पेडणेकर यांनी त्याला मराठीत बोल, अशी सूचना केली. त्यावरून दोघांमध्ये वाद घडला. सुजिता यांची बहीण विनीता याही वादात सामील झाल्या. कुरिअर घेऊ नको, याचा फोटो काढून मालकाकडे तक्रार करू, असे विनीताने सुजिता यांना सुचवले. तेव्हा रागाच्या भरात शेखने अर्वाच्य शिवीगाळ करत सुजिता यांच्या डोक्यात बुक्का मारला. जवळील पेनाने त्याने विनीता यांच्या चेहेऱ्यावर वार केला. आरडाओरडा ऐकून आलेल्या शेजाऱ्यांनी शेख याला पकडले आणि शिवाजी पार्क पोलिसांच्या ताब्यात दिले.