|| रसिका मुळ्ये

फोफावलेल्या शांळांतील अनिर्बंधव्यवस्थेला एनसीईआरटीचा लगाम

स्थानिक भाषाही नीट बोलता येत नाही अशा वयात हाती वही-पेन देऊन इंग्रजीच नाही, तर परदेशी भाषा शिकवण्याचे खासगी नर्सरी शाळांचे थोतांड आता काही प्रमाणात नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) पूर्वप्राथमिक वर्गासाठी अभ्यासक्रम आराखडा निश्चित केला असून स्थानिक भाषेतूनच पूर्वप्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात यावे, असे या आराखडय़ात नमूद करण्यात आले आहे.

या आराखडय़ानुसार लेखन, वाचन यांपेक्षा चित्र, कृती, खेळ यांच्या माध्यमातून सवयी, स्वत:ची ओळख, परिसराची ओळख व्हावी अशी अपेक्षा या आराखडय़ातून व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या फोफावलेल्या बाजारपेठेतील वाढलेल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जाहिरातबाजीच्या नव्या कल्पना, विविध क्लृप्त्या कंपन्या राबवत असतात. पहिलीत मोठय़ा शाळेतील प्रवेशाची हमी देण्यासाठी मुलाखतींची तयारी, लेखन, वाचन, अंकओळख यांची तयारी करून घेण्याच्या जाहिराती नर्सरी शाळा सर्रास करतात.

भाषेची जेमतेम ओळख होत असते अशा तिसऱ्या वर्षांपासूनच मुलांच्या मागे स्थानिक भाषा, इंग्रजी इतकेच नाही तर परदेशी भाषा शिक्षणाचा ससेमिरा नर्सरी शाळा लावतात. मुले स्पर्धेत कशी टिकणार या चिंतेत असलेल्या पालकांचाही प्रतिसाद या शाळांना मिळतो.

गरज का?

विद्यार्थ्यांवर त्यांच्या क्षमता विकसित होण्यापूर्वीच अभ्यास लादल्यामुळे, अशास्त्रीय पद्धतीने गोष्टी शिकवल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यांच्या शालेय शिक्षणावरही त्याचा परिणाम होतो, असे आराखडय़ात नमूद करण्यात आले आहे. या वयातील मुलांसाठी त्यांच्या कलाने एकाच प्रकारचा अभ्यासक्रम केल्यामुळे मुलांवरील दडपण कमी होऊ शकते.

अभ्यासक्रम कसा?

पूर्वप्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांची ओळख होणे, परिसराची, नात्यांची ओळख करून देणे, भावनांची ओळख करून देणे, खेळांच्या माध्यमातून शारीरिक हालचालींमधील सुसूत्रता साधणे, चित्रवाचन, ऐकण्याची क्षमता विकसित करणे, प्रश्नानुरूप प्रतिसाद देता येणे, स्वच्छतेच्या सवयी लागणे, सामूहात मिसळण्याची, वावरण्याची सवय होणे असे घटक या आराखडय़ात समाविष्ट करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना एकदम अक्षरओळख, लेखन न शिकवता त्यांची लेखणीवरील पकड बसण्यासाठी चित्र रंगवणे, कागदावर रेघोटय़ा मारणे अशा कृती करून घ्याव्यात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात त्यांच्या स्थानिक भाषेतून करून त्यानंतर हळूहळू त्यांना शिक्षणाचे माध्यम असणाऱ्या भाषेची ओळख करून द्यावी. पूर्वप्रथमिक शिक्षण टप्प्यापासूनच लिंग समानतेचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यात यावे अशा अपेक्षा या आराखडय़ातून व्यक्त करण्यात आल्या आहेत.

होणार काय? आतापर्यंत पूर्वप्राथमिक शिक्षणावर नियंत्रणच नसल्यामुळे मुलांवरील अशास्त्रीय पद्धतीने होणारा अभ्यासाचा मारा आता काहीसा आटोक्यात येणार आहे. एनसीईआरटीने पूर्वप्राथमिक वर्गासाठी अभ्यासक्रम आराखडा तयार केला आहे. पूर्वप्रथमिक वर्गातील (३ ते ६ वर्षे वयोगट) विद्यार्थ्यांना काय शिकवावे, कसे शिकवावे, उपक्रम कसे घ्यावेत, वयानुसार मुलांना काय येणे अपेक्षित आहे या बाबी एनसीईआरटीने स्पष्ट केल्या आहेत.