प्रकृती खालावल्याने जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या छगन भुजबळ यांना मंगळवारी केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. जे जे रुग्णालयात उदरविकारासंबंधीचे विशेष उपचारकक्ष नसल्याने केईएममधून दोन चाचण्या करण्याची परवानगी विशेष न्यायालयाने दिली आहे.

सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यावर २०१६ पासून आर्थर रोड तुरुंगात असलेल्या भुजबळांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ३ मार्च रोजी जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले होते. सोनोग्राफी व सीटी स्कॅन केल्यावर भुजबळांच्या स्वादुपिंडाला सूज दिसून आली होती. भुजबळांना दमा व श्वसनविकारही आहेत. रक्तदाब नियंत्रणात आणल्यावर मंगळवारी जेजे रुग्णालयातून त्यांना पाठवण्यात येणार होते. मात्र पुढील उपचारांसाठी हिपॅटोपॅन्क्रीटोबिलिरी (एचपीबी) आणि गॅस्ट्रोएण्ट्रोलॉजी (जीआय) या चाचण्यांची आवश्यकता असल्याचे जे. जे. रुग्णालयाकडून विशेष न्यायालयाला सांगण्यात आल्यावर केईएम रुग्णालयात चाचण्या करून घेण्याची परवानगी दिली गेली. त्यानुसार मंगळवारी दुपारी त्यांना केईएममध्ये हलवण्यात आले.