शक्तीमिल बलात्कार प्रकरणातील आरोपींची गुन्हेगारी पाश्र्वभूमी लक्षात घेता तसेच गुरुवारी एका आरोपीच्या कथित ‘बेपत्ता’ नाटय़ाच्या पाश्र्वभूमीवर आरोपींना कारागृहातून न्यायालयात बेडय़ा घालून आणण्यास सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांनी शुक्रवारी हिरवा कंदील दाखविला. दरम्यान, ११ ऑक्टोबर रोजी आरोपींवर वृत्तछायाचित्रकार तसेच भांडुप येथील तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकत्रित आरोप निश्चित करण्यात येण्याची शक्यता आहे.
गुरुवारी प्रकरणातील आरोपी सिराज खानच्या ‘बेपत्ता’ नाटय़ानंतर शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्या वेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अर्जाद्वारे आरोपींची गुन्हेगारी पाश्र्वभूमी लक्षात घेता ते पळून जाण्याची भीती व्यक्त केली. तसेच त्यांना कारागृहातून न्यायालयात बेडय़ा घालून आणण्यास परवानगी देण्याची विनंती केली. प्रकरणाचे तसेच गुरुवारच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश शालिनी फणसाळकर-जोशी यांनी निकम यांची विनंती मान्य केली. त्यातच शुक्रवारी प्रथमच चारही आरोपींचे वकील न्यायालयात हजर होते.
त्यानंतर भांडुप येथील तरुणीवर आरोपींनी केलेल्या बलात्कारप्रकरणी पोलीस ९ ऑक्टोबर रोजी आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती निकम यांनी न्यायालयाला दिली. तसेच वृत्तछायाचित्रकार आणि या प्रकरणी आरोपींवर एकत्रित आरोप निश्चित करण्याबाबत आपण युक्तिवाद करणार असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी ११ ऑक्टोबपर्यंत तहकूब केली असून त्याच दिवशी आरोपींवर आरोप निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.