पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँक घोटाळा प्रकरण हे नियंत्रक म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेचे (आरबीआय) अपयश आहे. याप्रकरणी आरबीआयविरोधात न्यायालयीन लढाईशिवाय पर्याय नाही, असा सूर पीएमसी बँकेच्या खातेदारांच्या मेळाव्यात उमटला. इंडियन र्मचट चेंबर येथे शनिवारी झालेल्या मेळाव्यात खातेदारांनी आरबीआयलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

पीएमसी बँकेने दिलेले कर्ज एचडीआयएल समूहाच्या कंपन्यांनी थकवले. ही कर्ज खाती अनुत्पादक (एनपीए) ठरली. मात्र, बँकेने कंपनीशी संगनमत करून या कर्ज खात्यांची माहिती आरबीआयपासून दडवली. यात पीएमसी बँकेला ४ हजार ३३५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. ही बाब उघड होताच आरबीआयने बँकेवर आर्थिक निर्बंध लादले. त्यामुळे ठेवीदार-खातेदारांचे पैसे अडकले. पैसे काढण्यावर मर्यादा आली. याबाबत खातेदारांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यांना एकत्र आणण्यासाठी ‘मनीलाइफ फाऊंडेशन’ने मेळावा आयोजित केला होता. काही खातेदारांनी स्वत:च पुढाकार घेत स्वाक्षरी मोहीम राबवून सर्वाना एकत्रित करण्याचा प्रयत्न केल्याचे यावेळी सांगितले.

‘आर्थिक निर्बंध लादून १८ दिवस उलटले तरी आरबीआयने खातेदारांनी उपस्थित केलेल्या शंका, प्रश्नांवर अधिकृत उत्तर दिलेले नाही. आरबीआयने उत्तर द्यावे. एचडीआयएलने किती कर्ज घेतले, हे सांगावे’, असे मनिलाइफ फाऊंडेशनच्या सुचेता दलाल म्हणाल्या. ‘आरबीआयचे बँकांवरील नियंत्रण सुटत चालले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आरबीआय मुख्य आरोपी आहे’, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.

या प्रकरणी जनहित याचिका दाखल करणे फायदेशीर ठरणार नाही. त्यापेक्षा हजारो खातेदारांनी रिट याचिका दाखल करणे योग्य ठरेल, असे सांगत त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्याची तयारी फाऊंडेशनच्या वकिलांनी दर्शवली. ‘न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर हा प्रश्न सुटायला कदाचित दहा वर्षे लागतील. पण, न्यायालयात गेलो नाही तर प्रश्न कधीच सुटणार नाही. त्यामुळे तुमची आयुष्यभराची कमाई परत मिळवण्यासाठी एक दिवस तरी वेळ काढा’, असे आवाहन त्यांनी केले.  यावेळी खातेदारांमधील अस्वस्थता दिसून आली. ज्येष्ठ पत्रकार अ‍ॅड. एस. बालकृष्णन, एमएसबीईएफचे देवीदास तुळजापूरकर आणि ‘सेंटर फॉर फायनान्शिअल अकाऊंटेबिलिटी’च्या प्रिया धर्शिनी उपस्थित होत्या.

अर्थमंत्र्यांविषयी रोष; पंतप्रधानांना साकडे घालणार

मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेले एक खातेदार मेळाव्याला हजर होते. त्यांनी ‘या संपूर्ण प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे वागणे अतिशय चुकीचे आहे. आम्ही सर्व कर भरून शिल्लक  बँकेत ठेवली. हे पैसे आमच्या हक्काचे आहेत. ते आम्हाला परत मिळालेच पाहिजेत’, असे म्हणत एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन पीएमसीच्या खातेदारांना केले.

१६ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघरमध्ये येणार असल्याने यावेळी त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडण्याचा निर्धार खातेदारांनी केला.