साडी, जेवणाचे डबे, टेपरेकॉर्डर, मनगटी घडय़ाळ यांचा समावेश

मुंबई : साडी, जेवणाचे नऊ डबे, पॅनासोनिकचा टेप रेकॉर्डर कम रेडिओ, मनगटावरचे घडय़ाळ इत्यादी अगदी किरकोळ वाटणाऱ्या वस्तूंची चोरी झाली, तर त्यात काय एवढे, असा प्रश्न पडू शकतो. मात्र याच किरकोळ वाटणाऱ्या वस्तूंची ३० वर्षांपूर्वी म्हणजेच ८०च्या दशकात तीही दक्षिण मुंबईतून झालेल्या चोरीचे विविध खटले ३० वर्षांनंतर पोलीस काही आरोपींना हजर करू शकले नाहीत म्हणून वा पुराव्यादाखल सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची चाळणी झाल्याच्या कारणास्तव मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी अखेर कुठल्याही निष्कर्षांविना निकाली काढले.

तीस वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेले खटले निकाली काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयांना दिले आहेत. त्यासाठी न्यायालयाने या न्यायालयांना मुदतही आखून दिली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्याच पाश्र्वभूमीवर मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी नुकतेच या किरकोळ वस्तूंच्या चोरीप्रकरणी दाखल विविध खटले निकाली काढले. यातील बहुतांशी गुन्हे हे लोकमान्य टिळक मार्ग (एल. टी. मार्ग) पोलिसांनी नोंदवले होते. १९८० मध्ये एल. टी. मार्ग पोलिसांनी दोन हजार ४०५ रुपयांची साडी आणि फॉल मटेरियल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला होता. याशिवाय नॅशनल पॅनासोनिक टेप रेकॉर्डर कम रेडिओ, २७०० रुपयांचे मनगटी घडय़ाळ तसेच जेवणाच्या नऊ डब्यांच्या चोरीचे गुन्हेसुद्धा दाखल केले होते. एवढेच नव्हे, तर १९८५ मध्ये गुन्हे अन्वेषण विभागानेही दुर्मीळ अशा १२ हजार रुपयांच्या व्हिडीओ कॅसेट रेकॉर्डरच्या चोरीचा गुन्हा दाखल केला होता. मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी महिन्याच्या सुरुवातीला जे काही खटले निकाली काढले, त्यात या सगळ्या किरकोळ वाटणाऱ्या चोऱ्यांच्या प्रामुख्याने समावेश आहे. काही प्रकरणे ही बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दाखल करण्यात आली होती. तीही न्यायालयाने निकाली काढली.

उपरोक्त बहुतांशी प्रकरणातील आरोपी खटले एवढी वर्षे प्रलंबित असतानाही सापडलेलेच नाहीत. आरोपींना हजर करण्यासाठी विविध मार्गही धुंडाळण्यात आले. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले, त्यांना फरारी घोषित करण्यात आले. त्यानंतरही आरोपींना हजर करण्यात पोलीस पूर्णपणे अपयशी ठरले.

काही प्रकरणांमध्ये तर पोलिसांनी आरोपींना हजर करण्यासाठी खूप वेळ घेतला. परंतु हजरच केले नाही. जेवणाच्या नऊ डब्यांच्या चोरीचे प्रकरण निकाली काढताना आरोपींविरोधात कुठलाही ठोस पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नाही, असे न्यायालयाने नमूद केले आहे.

आरोपी सापडणे अशक्य

आरोपींच्या जुन्या पत्त्यांवर वॉरंट बजावण्यात आले. त्यामुळे आरोपी हजर झाले नाहीत. शिवाय गेल्या ३० वर्षांत शहराचे रूपही खूप बदलले आहे. एवढय़ा किरकोळ वस्तूंप्रकरणी चोरीचे गुन्हे सहजी दाखल केले जात नाहीत. परंतु आरोपींना चोरी करताना पकडले गेले असल्याने या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असावे, असे पोलिसांतर्फे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे चोरीच्या वस्तू तक्रारदारांना परत करण्यात आल्याचे न्यायालयाने खटले निकाली काढताना म्हटले आहे, तर दुसरीकडे या वस्तू सध्या सापडणे शक्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.