लॅक्टिक असिडचा प्रमाणापेक्षा अधिक वापर केल्याचा दावा करीत शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनाने ‘पार्ले’च्या ‘कच्चा मँगो बाईट’चा साठा जप्त केला होता. मात्र ‘कच्चा मँगो बाईट’वरील कारवाई योग्य कशी हे स्पष्ट करण्यात शासनाला अपयश आल्याने न्यायालयाने जप्त केलेला माल परत करण्याचे आदेश देत ‘पार्ले’ला दिलासा दिला.
अन्न आणि औषध प्रशासनाने ‘कच्चा मँगो बाईट’चे नमुने ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली होती. त्या वेळी त्यात लॅक्टिक अ‍ॅसिडचा वापर प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आढळले.
त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने नांदेड, रायगड, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद येथील कंपनीच्या गोदामावर छापे टाकत तेथील सुमारे दोन कोटी ३६ लाख रुपयांच्या माल जप्त केला होता. या कारवाईविरोधात ‘पार्ले बिस्किट प्रा. लि.’ने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्या.एस. जे. वझिफदार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
त्या वेळेस न्यायालयाने ‘पार्ले’ने उपस्थित केलेले मुद्दे ग्राह्य मानत आणि ‘कच्चा मँगो बाईट’वरील कारवाई योग्य कशी हे दाखवून देण्यात सरकारला आलेले अपयश लक्षात घेत जप्त केलेला माल परत करण्याचे आदेश दिले.
खाद्यपदार्थामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिडचे प्रमाण किती असावे, ही बाब संबंधित कायद्यात स्पष्ट केलेली नाही. शिवाय या कायद्यानुसार, लॅक्टिक अ‍ॅसिडवर बंदीही घालण्यात आलेली नाही.
असे असताना एकीकडे ‘पार्ले’च्या ‘कच्चा मँगो बाईट’ या उत्पादकावर कारवाई केली जाते, मात्र लॅक्टिक अ‍ॅसिडचा वापर करणाऱ्या अन्य खाद्यपदार्थावर कारवाई करण्यात येत नाही हे न कळण्यासारखे आहे, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला आहे.