शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर आपल्याही पक्षाचा १२८वा वर्धापन दिन शिवतीर्थावर साजरा करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसच्या मनसुब्यांना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सुरुंग लावला. सांस्कृतिक आणि धार्मिक मेळाव्याच्या नावाखाली राजकीय पक्षांकडून, त्यातही दसरा मेळाव्यादरम्यान ध्वनिप्रदूषण आणि क्रिकेट खेळपट्टय़ा सुरक्षित ठेवण्याबाबतच्या नियमांच्या शिवसेनेने केलेल्या उल्लंघनाच्या पाश्र्वभूमीवर न्यायालयाने काँग्रेसला शिवतीर्थावर मेळावा घेण्यास स्पष्ट नकार देत ‘जोर का झटका’ दिला. ‘शांतता क्षेत्र’ असलेल्या शिवाजी पार्कवर सांस्कृतिक आणि धार्मिक मेळाव्यांच्या नावाखाली राजकीय पक्षांकडून वारंवार नियमांची सर्रास पायमल्ली केली जाते. हमी भरूनही अटींची पूर्तता केली जात नाही. हे गंभीर असून ते कुठेतरी थांबायला हवे, असे स्पष्ट करीत न्यायालयाने काँग्रेसला शिवाजी पार्कवर वर्धापन दिन साजरा करण्यास नकार दिला.