शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्राबाबत सुरू असलेल्या वादाला प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याच्या हेतुने दाव्यावरील सुनावणी ‘इन-कॅमेरा’ घेण्याची शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. ठाकरे कुटुंबियाला सार्वजनिक वलय आहे या कारणास्तव साक्षीपुराव्यांची इन-कॅमेरा घेतली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने उद्धव यांची मागणी फेटाळताना स्पष्ट केले.
दुसरीकडे उद्धव आणि जयदेव या ठाकरे बंधुंमध्ये या मृत्युपत्रावरून सुरू असलेल्या दाव्याची नियमित सुनावणी ४ डिसेंबरपासून सुरु होणार असल्याचेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.  
मृत्युपत्र करताना बाळासाहेबांची मन:स्थिती ठीक नव्हती, असा आरोप करीत जयदेव ठाकरे यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मृत्युपत्राबाबत दाखल केलेल्या ‘प्रोबेट’ला आव्हान दिले असून बाळासाहेबांच्या मृत्युपत्रावरील चार आक्षेपांवर सुनावणी घेण्यात येणार आहे. मागच्या सुनावणीच्या वेळेस उद्धव यांनी प्रकरणाची सुनावणी इन-कॅमेरा घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. ठाकरे कुटुंबाला सार्वजनिक वलय असून साक्षीदार उघडपणे साक्ष देऊ शकणार नाही. त्यामुळे सुनावणी इन-कॅमेरा घेण्याची मागणी उद्धव यांनी केली होती. परंतु ठाकरे कुटुंबाला सार्वजिनक वलय असल्याचे एकमेव कारण उद्धव यांच्याकडून देण्यात आले असून ते पुरेसे नसल्याचे सांगत जयदेव यांच्यातर्फे उद्धव यांच्या मागणीला तीव्र विरोध करण्यात आला.

‘जगजाहीर करायचेच’
न्यायमूर्ती गौतम पटेल यांनीही जयदेव यांचे म्हणणे मान्य करीत उद्धव यांची मागणी फेटाळून लावली. परंतु इन-कॅमेरा सुनावणीला विरोध करण्याच्या जयदेव यांच्या विनंतीवरून त्यांना हे सगळे जगजाहीर करायचे आहे असे दिसून येत असल्याचा टोलाही न्यायालयाने हाणला आणि अन्य दाव्यांच्या सुनावणीप्रमाणेच या प्रकरणाचीही सुनावणी होईल, असे स्पष्ट केले. विशिष्ट साक्षीदाराची साक्ष इन-कॅमेरा घेण्याची विनंती उद्धव करून शकतात असे नमूद करताना मात्र त्यांना त्यासाठी ठोस कारणे द्यावे लागतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.