हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या तिघांना दिलासा नाही

मुंबई : हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेला या पूलाची संरचनात्मक पाहणी करणाऱ्या कंपनीचा संचालक नीरज देसाई याच्यासह ए. आर. पाटील आणि संदीप काळकुते या पालिकेच्या दोन अभियंत्यांना सत्र न्यायालायने जामीन नाकारला आहे. त्यामुळे या तिघांना कारागृहातच राहावे लागणार आहे. महिनाभरापूर्वी तिघांना अटक करण्यात आली होती.

या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. त्यामुळे तिन्ही आरोपींना जामिनावर सोडण्यात आले, तर त्यांच्याकडून पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले जातील, अशी भीती व्यक्त करत राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. मंगेश अरोटे यांनी त्यांच्या जामिनाला विरोध केला होता. न्यायालयानेही राज्य सरकारचे म्हणणे मान्य करत शनिवारी या तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

पाटील हा पालिकेचा कार्यकारी अभियंता आहे, तर संदीप काळकुते हा सहाय्यक अभियंता आहे. महानगरदंडाधिकाऱ्यांनी जामीन नाकारल्यानंतर तिघांनीही सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. दोघांनीही पालिकेचे ‘ए’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त या दुर्घटनेस जबाबदार असल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी संबंधित सहाय्यक आयुक्ताने पूल विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला या पुलाच्या सुशोभिकरणाबाबत केलेल्या पत्रव्यवहाराचा दाखला दिला होता. या पत्रव्यवहारानुसार त्याला आयुक्तांनी या पूलाचे सुशोभिकरण करण्यास सांगितल्याचे तसेच त्याचाच भाग म्हणून पूल विभागाने पुलाच्या स्थितीबाबत मत देण्यासही सांगितले होते. परंतु पूल विभागाकडून पूलाच्या सुशोभिकरणास ‘ना हरकत’ देण्यापूर्वीच ‘ए’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी ९ नोव्हेंबर २०१६ रोजी घाईघाईने पूलाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू केले. त्यांनी असे का केले हे त्यांनाच माहीत, असा दावा जामीन अर्जात केला होता.

पुलाच्या कामाची हा सहाय्यक आयुक्त स्वत: जातीने पाहणी करत होता आणि ज्या कंत्राटदाराकडून पूलाची दुरूस्ती करण्यात येत होती. त्यांची बिलेही त्याच्याकडूनच मंजूर केली जात होती, असेही अर्जात म्हटले होते.