मुंबई : बलात्काराच्या आरोपाप्रकरणी अभिनेते अलोक नाथ यांच्याबाबत प्रसिद्धीमाध्यमे तसेच समाजमाध्यमांवर बोलण्यापासून लेखिका-दिग्दर्शक विन्ता नंदा यांना मज्जाव करण्याची नाथ आणि त्यांच्या पत्नीची मागणी दिंडोशी सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.

नाथ आणि त्यांच्या पत्नी आशु यांनी नंदा यांच्याविरोधात दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेत मानहानीचा दावा दाखल केला आहे. एवढेच नव्हे, तर नंदा यांनी आपली लेखी माफी मागून नुकसान भरपाई म्हणून एक रूपया देण्याची मागणीही नाथ आणि त्यांच्या पत्नीने केली आहे. तसेच नंदा यांना या प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमे वा समाजमाध्यमावरून व्यक्त होण्यास मज्जाव करण्याची मागणीही केली आहे. न्यायालयाने मात्र नाथ दाम्पत्याला त्याबाबत दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला. नाथ यांची पत्नी आशु यांनी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांकडेही धाव घेत नंदा यांच्याविरोधात अबुनुकसानीची तक्रार दाखल करून प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश पोलिसांना देण्याची मागणी केली. ‘मी टू’ मोहिमेत सहभागी होत नंदा यांनी समाजमाध्यमावर नाथ यांच्या नावाचा उल्लेख न करताच त्यांनी आपल्यावर १९ वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा आरोप करत खळबळ माजवली.