न्यायालयात सुरू असलेला खटला एकदा अनुभवायला मिळाला म्हणून तिथे बसल्यानंतर त्या खटल्याबद्दल, सुरू असलेल्या वाद-प्रतिवादाबरोबरच आजूबाजूला घडत बसलेल्या अनेक गोष्टी तरुण चैतन्यच्या मनाने टिपल्या होत्या. त्या खटल्याच्या अनुषंगाने समाजात जे काही चालले आहे ते अशाच एका खटल्याच्या माध्यमातून नव्या चित्रभाषेतून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा पहिलाच प्रयत्न प्रचंड यशस्वी ठरला. सतरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि आता थेट ‘ऑस्कर’च्या स्पर्धेत विदेशी चित्रपट विभागात या ‘कोर्ट’चा खटला मानाने रंगणार आहे. ८८ व्या ‘ऑस्कर’ पुरस्कारांसाठी विदेशी चित्रपट विभागात भारताकडून ‘कोर्ट’ हा चित्रपट पाठवण्यात येणार असल्याची घोषणा झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा ‘चैतन्य’ सळसळले आहे.

‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी यंदा भारताच्या ऑस्कर ज्युरी समितीचे नेतृत्व दिग्दर्शक, अभिनेता अमोल पालेकर यांच्याकडे होते. विदेशी चित्रपट विभागातील स्पर्धेसाठी आलेल्या वेगवेगळ्या भाषांतील ३० चित्रपटांमध्ये ‘कोर्ट’ या चित्रपटाची शिफारस करण्याचा निर्णय पालेकर यांच्या समितीने घेतला आहे. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या वतीने या समितीची नेमणूक करण्यात आली होती. या वर्षी ऑस्करमध्ये ‘कोर्ट’ भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचा निर्णय ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’चे महासचिव सुप्रन सेन यांनी बुधवारी जाहीर केल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत आनंद व्यक्त झाला तसेच योग्य चित्रपट पुरस्कारासाठी पाठवला जात असल्याची प्रतिक्रिया बॉलीवूडमधील दिग्दर्शक हंसल मेहता यांच्यासह अनेकांनी व्यक्त केली आहे.
२००९ मध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित ‘हरिश्चंद्राची फॅ क्टरी’ हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या स्पर्धेसाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता सहा वर्षांनी पुन्हा एकदा ऑस्करसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मराठी चित्रपटाला मिळाला आहे. ऑस्कर पुरस्कारासाठीच्या परीक्षक समितीचे सदस्य असलेल्या दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘कोर्ट’ या चित्रपटाची निवड झाल्याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. ‘कोर्ट’ चित्रपटाचे निर्माते विवेक गोम्बर आणि दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे हे दोघेही सध्या जपानमधील चित्रपट महोत्सवात सहभागी आहेत. ‘ऑस्कर’साठी प्रतिनिधित्व करण्याची संधी हा आम्हा दोघांसाठी आश्चर्याचा धक्का आहे, अशी प्रतिक्रिया चैतन्य ताम्हाणे यांनी व्यक्त केली आहे. या चित्रपटाच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर आम्ही जो विचार केला त्यापेक्षा किती तरी पटीने जास्त कौतुक या चित्रपटाने मिळवून दिले.
‘कोर्ट’चा विषय वेगळा असल्याने चित्रपटाची सुरुवात केल्यापासूनच आम्ही फार कमी अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र, आत्तापर्यंत जे मानसन्मान मिळाले ते इतके अनपेक्षित होते की, आता कुठल्याही प्रकारचे आडाखे न बांधणे यातच शहाणपणा असल्याचे लक्षात आले आहे, असे चैतन्य ताम्हाणे यांनी म्हटले आहे. ८८ व्या ऑस्कर स्पर्धेसाठी ‘कोर्ट’ची निवड करणाऱ्या परीक्षकांचे आणि चित्रपटाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे चैतन्यने आभार मानले आहेत.

गीतांजली कुलकर्णी,
अभिनेत्री (कोर्ट)

नवे विचार, नवी चित्रभाषा यावर जगभरातील प्रेक्षकांचे एकमत
तरुणाईचे विचार, त्यांच्या भावभावना समजून घेण्याचा प्रयत्न सहसा केला जात नाही. ‘कोर्ट’ या चित्रपटातून चैतन्यने नवा विषय, नव्या पद्धतीने, नव्या चित्रभाषेत मांडला आणि जगभरातून त्याच्या या नावीन्यावर एकमत झाले आहे, हे आजच्या निवडीने सिद्ध झाले. असे भाग्य फार चित्रपटांच्या वाटय़ाला येत नाही. तरुण दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट आहे म्हणून कोणीही त्याची हेटाळणी केली नाही. उलट, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असेल, राष्ट्रीय पुरस्कार असतील किंवा ऑस्कर पुरस्कारांसाठी निवड समिती असेल प्रत्येकाने या चित्रपटामागे दिग्दर्शकाचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला हे कौतुकास्पद असून त्यामुळे चित्रपट माध्यमात नवे काही करू पाहणाऱ्या तरुणाईला प्रोत्साहन मिळेल.

नवोदित दिग्दर्शकांच्या मराठी चित्रपटांची ‘ऑस्कर’वारी
चैतन्य ताम्हाणे या अवघ्या वीस वर्षांच्या दिग्दर्शकाचा ‘कोर्ट’ हा पहिलाच चित्रपट आहे. कुठलेही चित्रपट प्रशिक्षण न घेता स्वत:च हे माध्यम समजून घेत केलेल्या त्याच्या पहिल्या चित्रपटाला पुरस्कार समितीने थेट ‘ऑस्कर’च्या वाटेवर धाडून कौतुकाची पावती दिली आहे. योगायोग म्हणजे २००९ मध्ये याच विभागात ऑस्करसाठी नेतृत्व करणारा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हाही दिग्दर्शक परेश मोकाशीचा पहिलाच चित्रपट होता. त्याहीआधी २००४ साली ज्या मराठी चित्रपटाने ऑस्करच्या स्पर्धेत पोहोचण्याइतपत भरारी घेतली तो ‘श्वास’ हा पहिला मराठी चित्रपट संदीप सावंत या नवोदित दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट होता.