उच्च न्यायालयाच्या चपराकीनंतर माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांची बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी खुली चौकशी सुरू करण्यात आली असली तरी गावित आणि त्यांच्या कुटुंबियांवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची बाब शुक्रवारी उघड झाली. त्याची दखल घेत अद्याप गुन्हा दाखल का केला नाही, अशी विचारणा करीत न्यायालयाने राज्य सरकारला त्याबाबत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिल़े
दरम्यान, गावित, त्यांची पत्नी कुमुदिनी आणि भाऊ शरद यांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीसाठी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षकाची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची आणि अधीक्षक या चौकशीवर देखरेख ठेवणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने शुक्रवारी देण्यात आली. गावित यांच्या आईच्या आणि अन्य भावांच्या मालमत्तेचीही चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.  
विष्णू मुसळे यांनी या प्रकरणी केलेल्या याचिकेवर न्या. अभय ओक आणि न्या. ए. एस. चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळेस अंकुर पाटील यांनी हस्तक्षेप अर्ज करीत गावित आणि त्यांच्या कुटुंबियांची खुली चौकशी करण्यात येत असली तरी अद्याप त्यांच्यावर गुन्हा मात्र नोंदविण्यात आलेला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला देत याप्रकरणी चुकीच्या पद्धतीने तपास करण्यात येत असल्याचे सांगितले. अर्जाबाबत आवश्यक ती प्रक्रिया न करताच पाटील यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आल्याने न्यायालयाने सुरुवातीला त्यांचे म्हणणे ऐकण्यास नकार दिला. मात्र गावित व कुटुंबियांवर अद्याप गुन्हा नोंदविण्यात आलेला नसल्याची बाब पाटील यांनी निदर्शनास आणून दिल्यावर न्यायालयाने सरकारी वकिलांकडे त्याबाबत विचारणा केली. त्यावर समाधानकारक उत्तर देता न आल्याने न्यायालयाने या विचारणेबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश देत प्रकरणाची सुनावणी तहकूब केली.