पायल तडवी आत्महत्या प्रकरणी न्यायालयाचा निर्णय

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील दोन आरोपींविरोधात महाराष्ट्र वैद्यक परिषदेने (एमएमसी) सुरू केलेल्या चौकशीला उच्च न्यायालयाने ११ जूनपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे.

डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहेर या दोघींनी त्यांच्याविरोधात ‘एमएमसी’ने नोव्हेंबरमध्ये सुरू केलेल्या चौकशीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोघी सध्या जामिनावर असून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत आहेत.

डॉ. तडवी यांच्या आईने नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेऊन ‘एमएमसी’ने या दोघींविरोधात चौकशी सुरू केली आहे, मात्र आपल्यावर ज्या आरोपांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येत आहे त्याच आरोपांतर्गत ‘एमएमसी’ चौकशी करत आहे. या चौकशीदरम्यान त्यांच्या बचावार्थ सादर केलेल्या पुराव्यांचा फौजदारी खटल्यातील बचावावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमएमसीतर्फे केल्या जाणाऱ्या चौकशीला खटल्याचा निकाल येईपर्यंत स्थगिती द्यावी, अशी मागणी डॉ. खंडेलवाल आणि डॉ. मेहेर या दोघींनी उच्च न्यायालयाकडे केली होती. न्या. के. के. तातेड आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने याचिकाकत्र्यांतर्फे केला गेलेला युक्तिवाद प्रामुख्याने विचारात घेतला. तसेच फौजदारी खटल्याच्या आधारे प्रतिवाद्यांनी याचिकाकत्र्यांविरोधात विभागीय चौकशी सुरू केल्याचे सकृद्दर्शनी दिसत असल्याचे नमूद केले. त्याचप्रमाणे ‘एमएमसी’तर्फे केल्या जाणाऱ्या चौकशीला पुढील सुनावणीपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली.