करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वाभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या मोहिमेचा भाग म्हणून संपूर्ण आठवडा उच्च न्यायालयाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने घेतला होता. या समितीने राज्यातील सगळी कनिष्ठ न्यायालये, औद्योगिक न्यायालये, उच्च न्यायालयाच्या अंतर्गत काम करणारे लवाद इत्यादींचे कामकाजही गुरूवार,शुक्रवार आणि शनिवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयांचे कामकाजही संपूर्ण आठवडा होणार नाही.

या आठवड्यात उच्च न्यायालय प्रशासकीय समितीने सोमवारी कनिष्ठ न्यायालयांना सुट्टी जाहीर केली होती. मंगळवारी गुढीपाडव्याची तर बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुट्टी आहे. त्यामुळे १५ ते १७ एप्रिल या तीन दिवसाचे कनिष्ठ न्यायालयांतील कामकाजही बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. या तीन सुट्टयांची भरपाई म्हणून १९ जून ३ व १७ जुलैला न्यायालयाचे कामकाज केले जावे, असेही स्पष्ट करण्यात आले.