|| शैलजा तिवले

तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अद्याप सुरू असताना भारत बायोटेक निर्मित ‘कोव्हॅक्सिन’ या पहिल्या स्वदेशी करोनाप्रतिबंध लशीच्या आपत्कालीन वापरास केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने(डीसीजीआय) मान्यता दिल्याने सर्व स्तरांतून टीका होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे या लशीच्या परिणामकतेबाबत साशंकताही व्यक्त केली जात असून, लसमान्यतेचे निकष जाहीर करण्याची मागणी होत आहे.

२६ हजार व्यक्तींना ‘कोव्हॅक्सिन’ लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत सहभागी करून घेतले जाणार आहे. आत्तापर्यंत २१ हजार स्वयंसेवकांची नोंदणी झाली आहे. पहिला डोस पूर्ण झाला असला तरी २८ आठवडय़ांनी द्यायच्या दुसऱ्या डोसचा टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही. हा टप्पा पूर्ण होऊन मार्चपर्यंत लशीचे निष्कर्ष हाती येण्याची शक्यता आहे. परंतु या आधीच लशीला मान्यता देणे धक्कादायक असल्याचे ऑल इंडिया ड्रग अ‍ॅक्शन नेटवर्कने (एआयडीएएन) सांगितले.
लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ७५० स्वयंसेवकांवर केलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष कंपनीने मांडले आहेत. याव्यतिरिक्त प्राण्यांवर केलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष सध्या उपलब्ध आहेत. तेव्हा परिणामकता आणि सुरक्षितता या दोन्ही पातळीवर चाचणी न केलेल्या आणि सिद्ध न झालेल्या लशीला मान्यता देणे नियमबाह्य़ असल्याचे ‘एआयडीएएन’ने म्हटले आहे. तसेच लशीला मान्यता देण्याचे निकष जाहीर करण्याची मागणी केली आहे.

नवकरोनाच्या पाश्र्वभूमीवर या लशीला मान्यता दिल्याचे ‘डीसीजीआय’ने जाहीर केले आहे. ही लस ‘सार्स कोविड-२’ या विषाणू प्रतिबंधासाठी परिणामकारक आहे का, याबाबतचा पुरेसा अभ्यास प्रसिद्ध झालेला नसताना नव्या करोना विषाणूसाठी प्रतिबंधात्मक असेल, हा कल्पनात्मक विचार आहे, असे संसर्गजन्य आजाराच्या संशोधक डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितले.

घाईने हा निर्णय घेण्याऐवजी काही आठवडे थांबून अंतरिम निष्कर्ष हाती आल्यानंतर ही मान्यता देणे योग्य होते, असे अनंत भान यांनी सांगितले.

भारतीय वैज्ञानिकांच्या विश्वासार्हतेवर घाला -डॉ. टी सुंदरारामन

– वैद्यकीय चाचण्या ही संशोधन प्रक्रिया असते. यातून सकारात्मक किंवा नकारात्मक निष्कर्ष येण्याची शक्यता असते. परंतु तुम्ही सकारात्मक निष्कर्ष येणारच असा अंदाज लावून काम करत असाल तर तुमचे संशोधन हे संकुचित आहे.

– विज्ञान हे निष्कर्षांच्या मूलभूत तत्त्वावर आधारलेले असून अशा रीतीने निष्कर्ष न पडताळता लशीला मान्यता देण्याचा निर्णय विज्ञानाला तडा देणारा आहे. यामुळे भारतीय वैज्ञानिकांची विश्वासार्हता जगभरात कमी होईल.

– या निर्णयाचा भारतातील वैज्ञानिक समूहाकडून निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे पीपल्स हेल्थ मूव्हमेंटचे सहसमन्वयक डॉ. टी सुंदरारामन यांनी सांगितले.

– परिणामकतेची तपासणी न करताच मान्यता देण्यासाठी केलेली घाई भारतीय लशीसाठी धोक्याची ठरू शकते. यामुळे लशीच्या विश्वासार्हतेबाबत साशंकता निर्माण होण्याचा संभव अधिक असून भविष्यात लशीचे अन्य पर्याय उपलब्ध असताना ‘कोव्हॅक्सिन’ का घ्यावी, याबाबत नक्कीच लोक विचार करतील, असेही डॉ. टी सुंदरारामन यांनी अधोरेखित केले.

वापराबाबत संभ्रम

आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय चाचण्यांच्या तत्त्वावर लशीला मान्यता देत असल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु, लशीच्या वापराबाबत पुरेशी स्पष्टता डीसीजीआयने दिलेली नाही. लस दिलेल्यांकडून संमतीपत्रक घेतले जाईल. मात्र, आणखी कोणत्या अटी लागू केल्या जातील, आरटीपीसीआर चाचण्या होणार का, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. रविवारच्या पत्रकार परिषदेत याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता होती. परंतु ती न झाल्याने लशीच्या वापराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.