कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडय़ात मात्र बाधितांच्या प्रमाणात वाढ

मुंबई : राज्याचा करोना रुग्णआलेख घसरत असून, मुंबई, ठाण्यात लक्षणीय रुग्णघट नोंदविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ातील ग्रामीण भागांत मात्र या विषाणूचा विळखा वाढत आहे. या भागांत बाधितांचे प्रमाणही सुमारे २० ते ३० टक्के आहे.

मुंबईत रविवारी करोनाचे १,४३१ रुग्ण आढळले, तर ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात नव्या रुग्णांपेक्षा अधिक म्हणजे १,४७० रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले. ठाणे जिल्ह्यातही नव्या रुग्णांमध्ये घट होत असून, रविवारी ९०७ रुग्ण आढळले. दिवसभरात ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. १६ ते २२ मेदरम्यान मुंबई, ठाण्यात आधीच्या आठवडय़ाच्या तुलनेत किंचित (अनुक्रमे १.३३ टक्के आणि २.१२ टक्के) रुग्णसंख्या वाढली आहे. मात्र, रुग्णसंख्येतील हा चढ-उतार अत्यल्प आहे.

पुणे महानगरपालिका क्षेत्रात संसर्ग कमी झाला असला तरी पुणे ग्रामीणमध्ये मात्र रुग्णसंख्या ५ टक्क्यांनी वाढली आहे. मृतांची संख्याही या भागात १५ टक्क्यांनी वाढली आहे.  सरलेल्या आठवडय़ाच्या आकडेवारीनुसार पश्चिम महाराष्ट्रात गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत सोलापूर आणि सांगली जिल्ह्य़ातील ग्रामीण भागांत सर्वाधिक म्हणजे १३ टक्के रुग्णवाढ झाली आहे. त्याखालोखाल सातारा (८ टक्के), कोल्हापूर (१० टक्के) रुग्णसंख्या वाढली आहे.

कोकणातही करोनाचा फैलाव वाढला असून, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत १० टक्क्यांनी रुग्णसंख्या वाढली आहे. मराठवाडय़ात सर्वाधिक म्हणजे ११ टक्के रुग्णवाढ उस्मानाबादमध्ये नोंदवली गेली. त्याखालोखाल बीडमध्ये ९ टक्के तर औरंगाबाद, परभणीमध्ये ६ टक्क्यांनी रुग्णवाढ झाली आहे.

झपाटय़ाने झालेली रुग्णवाढ, मर्यादित सार्वजनिक आरोग्य व्यवस्था यांमुळे या विभागांमध्ये खाटा मिळविण्यासाठी रुग्णांना पायपीट करावी लागत असून, अनेक रुग्ण मुंबईकडे धाव घेत आहेत.

अमरावतीतील करोना संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. आठवडाभरात रुग्णसंख्येत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मृतांची संख्याही १३ टक्क्यांनी वाढली आहे.

पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक प्रसार

पहिल्या लाटेच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ात दुसऱ्या लाटेत अधिक करोनाप्रसार होत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. पहिल्या लाटेत सातारा, सांगली, कोल्हापूर येथे सुमारे दहा हजार रुग्ण बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत हे प्रमाण अनुक्रमे १०९ टक्के, ४८ आणि ५८ टक्क्यांनी वाढले. सोलापूरमध्ये पहिल्या लाटेत सुमारे साडेसात हजार रुग्णांना बाधा झाली होती, तर दुसऱ्या लाटेत ही संख्या १५७ टक्क्यांनी वाढली. कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अनुक्रमे तीन हजार आणि १३०० रुग्ण आढळले होते. दुसऱ्या लाटेत मोठय़ा प्रमाणात संसर्ग प्रसार झाला असून हे प्रमाण सुमारे २५० टक्क्यांनी वाढले आहे. मराठवाडय़ात पहिल्या लाटेच्या तुलनेत सर्वाधिक २६४ टक्क्यांनी रुग्णवाढ बीडमध्ये झाली आहे. याखालोखाल जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्य़ांचा समावेश आहे.

कोल्हापूरमध्ये मृत्यूवाढ

राज्यात सर्वाधिक मृतांचे प्रमाण सध्या कोल्हापूर जिल्ह्य़ात असून, गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत कोल्हापूरमध्ये ५३ टक्क्यांनी मृत्यूसंख्येत वाढ झाल्याचे दिसते. एका आठवडय़ात कोल्हापूर ग्रामीणमध्ये ८४४ मृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल बीड (२४ टक्के) सोलापूर (२० टक्के), सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी (१६ टक्के), औरंगाबाद (१५ टक्के) मृतांची संख्या वाढली आहे. राज्याच्या एकूण मृत्युदरातही वाढ झाली असून हा दर १.५० टक्क्यांवरून १.५६ टक्क्यांवर गेला आहे.

राज्यात २६,६७२ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे २६,६७२ रुग्ण आढळले असून, ५९४ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात मुंबईत १४३१, नाशिक शहर ४२५, सातारा २००८, सोलापूर १५४८, रत्नागिरी ९२०, अमरावती ८७२, नागपूर शहर ३२६, उर्वरित नागपूर जिल्हा ६७१ नवे रुग्ण आढळले. राज्यात सध्या ३ लाख ४८ उपचाराधीन रुग्ण आहेत.

बाधितांचे प्रमाण साताऱ्यात सर्वाधिक :  राज्यात बाधितांचे सर्वाधिक प्रमाण साताऱ्यात (३२ टक्के) आहे. त्याखालोखाल परभणी (२७ टक्के), उस्मानाबाद (२६ टक्के), रत्नागिरी (२२ टक्के), सिंधुदुर्ग (२४ टक्के), सांगली (२१ टक्के) आहे.

देशात रुग्णघट, पण मृत्यूवाढ

देशाची दैनंदिन रुग्णसंख्या सलग सातव्या दिवशी तीन लाखांखाली नोंदवली गेली. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ४० हजार रुग्ण आढळले, तर ३,७४१ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांमध्ये घट नोंदविण्यात येत असली तरी मृतांमधील वाढ कायम आहे. देशातील एकूण करोनाबळींची संख्या तीन लाखांच्या  उंबरठय़ावर आहे.