‘जी दक्षिण’ विभागातील रुग्णदुपटीचा कालावधी १५४ दिवसांवर

मुंबई : वरळी, प्रभादेवीचा भाग असलेला जी-दक्षिण विभाग कार्यालयाचा परिसर सुरुवातीच्या काळात करोना संक्रमण आणि रुग्णांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून या भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात आली असून हा परिसर रुग्णवाढीत सर्वात शेवटच्या क्रमांकावर पोहोचला आहे. मुंबईतील २४ विभागांतील जी दक्षिण परिसरातील रुग्णवाढही कमी झाली असून या विभागातील रुग्ण दुपटीचा कालावधीही १५४ दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईत करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि काही दिवसांमध्येच वरळी परिसरात करोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली. २६ मार्चला वरळी कोळीवाडय़ात पहिला रुग्ण आढळला आणि बघता बघता रुग्णांची संख्या वाढतच गेली. १ एप्रिलला संपूर्ण कोळीवाडा प्रतिबंधित केला. त्यानंतर प्रभादेवीत, बीडीडीच्या चाळीत करोनाचे रुग्ण सतत वाढतच होते. रुग्णसंख्येत वरळी, प्रभादेवीचा भाग असलेला जी दक्षिण विभाग सतत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे या विभागातील रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात आली. ऑक्टोबरपासून या भागातील रुग्णवाढीचा दर अध्र्या टक्क्यापेक्षाही खाली आला आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी मुंबईत सरासरी १०० दिवसांवर असताना वरळी, प्रभादेवीत हाच कालावधी १५४ दिवसांवर गेला आहे. या भागात अजूनही नवीन रुग्णांची नोंद होत असली तरी त्यांची संख्या दर दिवशी ५० पेक्षाही कमी आहे.

मुंबईतील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये करोनाला अटकाव कसा करायचा याची कोणतीही सुनिश्चित पद्धती नसताना सगळ्याच सरकारी यंत्रणा चाचपडत होत्या. त्या वेळी वरळीत या उपाययोजनांना प्रथम सुरुवात झाली. गावठाण प्रतिबंधित करणे, रुग्णांना शोधणे, त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, त्यांचे विलगीकरण करणे, संसर्ग वाढू न देणे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे ही कसरत पालिकेच्या विभाग कार्यालयाने केली. या सगळ्या समस्यांतून मार्ग काढतच करोना लढय़ाचा ‘वरळी कोळीवाडा पॅटर्न’ उभा राहिला.

पालिकेच्या जी दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त शरद उघडे आणि पालिकेचे कर्मचारी यांनी या भागात मेहनत घेऊन संकटावर मात केली आणि संसर्ग आटोक्यात आणला. एकही रुग्ण आढळला की त्याच्या निकट संपर्कातील लोकांच्या चाचण्या करून रुग्ण शोधण्याचे, संसर्गाची साखळी शोधताना या रुग्णांना दाटीवाटीच्या लहानशा खोल्यांमध्ये ठेवणे धोकादायक होते. त्यामुळे त्यांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्याचा प्रयोग प्रथम येथे

केला गेला, तर रुग्णांसाठी एनएससीआय स्टेडिअमवर ५०० खाटांचे कोविड काळजी केंद्र तयार करण्यात आले.

आताही जास्तीत जास्त चाचण्या, रुग्णांच्या निकट संपर्काचा शोध घेणे, सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरूच असून त्यामुळेच रुग्णसंख्या आटोक्यात असल्याची प्रतिक्रिया पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

वरळी, प्रभादेवीतील सद्य:स्थिती

८९३५         एकूण रुग्णसंख्या

७६५९           करोनामुक्त

४७२             मृत्यू

८०४              सक्रिय रुग्ण

०.४५%           रुग्णवाढीचा दर

१५४ दिवस     रुग्ण दुपटीचा कालावधी