इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई: सप्टेंबरपासून मुंबईतील रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून रुग्ण दुपटीचा कालावधी दोन महिन्यांवर आला आहे. मात्र उपचाराधीन रुग्णांची संख्या अवघ्या एका महिन्यात तब्बल दुप्पट झाली आहे. ऑगस्टमध्ये १७ हजारावर पोहोचलेली रुग्णसंख्या सप्टेंबरमध्ये ३४ हजारावर पोहोचली आहे.

सप्टेंबर महिन्यापासून मुंबईतील रुग्णवाढीचा दर वाढला आहे. ऑगस्टमध्ये आटोक्यात आलेला करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. रुग्णवाढीचा दर वाढला आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला आहे. त्याचबरोबर करोनामुक्त रुग्णांचा टक्काही घसरू लागला आहे. या सगळ्यामुळे सक्रीय म्हणजेच उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. मुंबईतील सक्रीय रुग्णांची संख्या गेल्या महिन्याच्या तुलनेत ९३ टक्के वाढली आहे.

मार्च, एप्रिलपासून मुंबईत करोनाचा कहर सुरू झाला आणि जुलै महिन्यात रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. त्यानंतर मात्र रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली. रुग्णवाढीचा दर एक टक्कय़ांपेक्षाही खाली आला. तर ८० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले होते. रुग्ण दुपटीचा कालावधी तीन महिन्यांवर गेला होता. मात्र सप्टेंबर नंतर गेल्या पंधरा दिवसात संपूर्ण चित्र पालटले आहे.

दररोज दोन हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत असून त्यापैकी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागले आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार १८ ऑगस्ट रोजी रुग्णवाढीचा दर ०.७९ टक्के होता. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या १७,६९७ होती. १५ ऑगस्ट रोजी हीच संख्या १७,५८४ म्हणजेच पाच महिन्यातली सर्वात कमी संख्या होती.

१८ सप्टेंबरला उपचाराधीन रुग्णांची संख्या ३४,१३६ झाली आहे. त्यात तब्बल ९३ टक्कय़ांची वाढ झाली आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात साडे पाच हजार सक्रीय रुग्णांची भर पडली आहे. तर दुसऱ्या आठवडय़ात सहा हजारांनी हे रुग्ण वाढले आहेत.

टाळेबंदी शिथिल केल्यानंतर लोकांचा सार्वजनिक ठिकाणचा वावर वाढला आहे. त्याचबरोबर चाचण्यांची संख्याही वाढवल्यामुळे रुग्ण आढळू लागले आहेत. मात्र यात लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याची प्रतिक्रिया पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

१७,५८४ गेल्या पाच महिन्यातले सर्वात कमी उपचाराधीन रुग्ण (१५ ऑगस्ट )-

१७,६९७ उपचाराधीन रुग्ण (१८ ऑगस्ट )-रुग्णवाढीचा वेग —०.७९ टक्के

३४,१३६ उपचाराधीन रुग्ण (१८ सप्टेंबर)

रुग्णवाढीचा वेग —१.२५ टक्के

दिवसभरात ५,००० जण करोनामुक्त

मुंबई : मुंबईत शनिवारी एका दिवसात ५,१०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे करोनामुक्त रुग्णांची संख्या ७८ टक्के  झाली आहे. शनिवारी २२११ रुग्णांची नोंद झाली असून ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या १ लाख ८२ हजाराच्या पुढे गेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज दोन हजारांच्या पुढे रुग्णांची नोंद होत असून एका दिवसात बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र शनिवारी पाच हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले. आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७६९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर एकूण बाधितांची संख्या १ लाख ८२ हजार ०७७ वर गेली आहे.

शनिवारी ५० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृतांपैकी ४१ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यात ३७ पुरुष व १३ महिला होत्या. तर तब्बल ८ जणांचे वय ४० वर्षांंखालील होते. मृतांचा एकूण आकडा ८४२२ वर गेला आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर १.२४ टक्कय़ांवर गेला आहे. तर बोरिवली, वांद्रे पश्चिम, अंधेरी पश्चिम, दहिसर, येथील रुग्णवाढीचा दर दीड टक्कय़ांपेक्षा जास्त आहे. बोरिवली, कांदिवली, अंधेरी पश्चिम, ग्रॅंटरोड, मुलुंड, मालाड, अंधेरी पूर्व, घाटकोपर, या भागांत दररोज १०० च्या आसपास रुग्णांची नोंद होत आहे.

२५ टक्के अहवाल होकारात्मक

मुंबईत दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून आतापर्यंत ९ लाख ९० हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. दरदिवशी १३ हजारांपेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत. त्यात ३० टक्के  चाचण्या या प्रतिजन चाचण्या असतात. दिवसभरातील २५ टक्के अहवाल होकारात्मक येत आहेत.

राज्यातही रुग्ण बरे होण्याचे वाढते प्रमाण

मुंबई  :  राज्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशी रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली. दिवसभरात २३,५०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. नव्याने २१,९०७ रुग्णांचे निदान झाले असून, ४२५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांत ४५ हजार रुग्ण बरे झाले आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्याही तुलनेत कमी झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने आरोग्य विभागाची चिंता काहीशी कमी झाली आहे. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ३२,२१६ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ११ लाख ८८ रुग्ण करोनाबाधित झाले. दिवसभरात मुंबई २२११, रायगड ६६६, नाशिक ११४१, नगर ९३०, सोलापूर ५३८, सातारा ७७६, सांगली ९५२, नागपूर २१००, पुणे शहर १७४५, पिंपरी-चिंचवड ९१९, उर्वरित पुणे जिल्हा १३६६ रुग्ण आढळले.

ठाणे जिल्ह्य़ात १,७८८ नवे रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी १ हजार ७८८ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ात करोना रुग्णांची एकूण रुग्णांची संख्या १ लाख ५६ हजार ९२२ वर पोहोचली आहे. तर, दिवसभरात ३४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्य़ातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ११६ वर पोहोचली आहे. शनिवारच्या नव्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील ४७०, नवी मुंबई ४०८, ठाणे ३९५, मीरा-भाईंदरमधील १७३, ठाणे ग्रामीणमधील १४७, बदलापूरमधील ६८, अंबरनाथमधील ४९, उल्हासनगर ४७ आणि भिवंडीतील ३१ रुग्णांचा समावेश आहे.

देशात २४ तासांत ९६ हजार करोनामुक्त

नवी दिल्ली : देशातील करोनाग्रस्तांच्या संख्येने शनिवारी ५३ लाखांचा आकडा ओलांडला. मात्र, २४ तासांत ९५,८८० जण करोनामुक्त झाले, तर याच कालावधीत ९३,३३७ लोकांना करोनाचा संसर्ग झाला. करोनाबाधितांची एकूण संख्या ५३,०८,०१४ झाली आहे.