दाटीवाटीच्या परिसरात करोना फैलावू लागल्याने चिंता

मुंबई : आतापर्यंत मुंबईतील सर्वात कमी रुग्णसंख्येचा भाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या मशीद बंदर, डोंगरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण वाढू लागले आहेत. या परिसरात आता १० ते १५ रुग्ण रोज आढळून येत आहेत.  मुंबईतील इतर भागांत हजारोंच्या संख्येने बाधितांची संख्या असताना दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, डोंगरी, उमरखाडीचा भाग असलेल्या बी विभागात मात्र सर्वात कमी रुग्णसंख्या होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या भागात दर दिवशी नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. संपूर्ण मुंबईचा रुग्णवाढीचा सरासरी दर ०.८७ टक्के  असताना या भागात रुग्णवाढीचा दर अचानक १.२ टक्के  झाला आहे. तर मुंबईचा रुग्णदुपटीचा कालावधी ८७ दिवसांवर असताना बी विभागात हा कालावधी ५७ दिवसांपर्यंत खाली आला आहे. जुलै महिन्यात या विभागाचा रुग्ण दुपटीचा कालावधी १०० दिवसांवर होता.

बी विभागात सध्या ११०४ रुग्ण असून मुंबईतील सर्वात कमी बाधित या भागात आहेत. तुलनेने कमी व्याप्ती असलेल्या या भागात ७९१ रुग्ण करोनामुक्त झाले असून ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २३० सक्रिय रुग्ण आहेत. ‘या विभागात मुळातच रुग्णसंख्या कमी आहे. त्यामुळे थोडय़ा संख्येने रुग्ण वाढले तरी रुग्णवाढीचा दर वाढलेला दिसतो,’ असे मत बी विभागाचे साहाय्यक आयुक्त नितीन आर्ते यांनी व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे, मात्र आम्ही खबरदारी घेत आहोत. रुग्णांच्या संपर्काचा शोध घेणे, पाठपुरावा करणे आदी उपायांमुळे इथे रुग्णसंख्या नियंत्रणात आहे, असेही आर्ते यांनी सांगितले.

बी विभागातील रुग्णसंख्या

तारीख  एका दिवसातले रुग्ण

१४ जुलै              ६

१५ जुलै             ६

१६ जुलै              १२

१७ जुलै              ४

१८ जुलै              ६

१९ जुलै              ८

२० जुलै              १

एकूण            ९०९

रुग्ण दुपटीचा कालावधी -१०० दिवस

तारीख  एका दिवसातले रुग्ण

३ ऑगस्ट      १६

४ ऑगस्ट      १३

५ ऑगस्ट      १३

६ ऑगस्ट      ११

७ ऑगस्ट      १४

८ ऑगस्ट      १०

९ ऑगस्ट      १३

एकूण रुग्ण     ११०४

रुग्ण दुपटीचा कालावधी -५२ दिवस