प्रसाद रावकर

मुंबईमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने करोना काळजी केंद्रे, करोना समर्पित केंद्रे बंद करून खर्चाला आवर घालण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू होता. मात्र, नवकरोनाचे संकट घोंघावू लागल्याने प्रशासनाला करोना केंद्रांचा कारभार गुंडाळणे अवघड बनले आहे. त्यामुळे आणखी महिनाभर करोना केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासन पातळीवर घेण्यात आला आहे. याचा आर्थिक भार पालिकेला सोसावा लागणार आहे.

मुंबईत करोना संसर्ग सुरू झाल्यानंतर त्याबाबतची तपासणी, चाचणी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात करण्यात येत होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ठिकठिकाणी बाधित आणि संशयित रुग्णांसाठी करोना केंद्रे सुरू करण्यात आली. प्रशासनाने ४६ हजार ७१२ खाटांची क्षमता असलेली ३३६ करोना काळजी केंद्रे-१, तर २३ हजार ८०६ खाटांची क्षमता असलेली १८१ करोना काळजी केंद्रे-२ सुरू करण्याचे नियोजन केले होते. यापैकी बहुतांश केंद्रे सुरू करण्यात आली होती. मात्र मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ही केंद्रे बंद करण्यात आली. आजघडीला १२ हजार ६०३ खाटांची क्षमता असलेली २७ करोना काळजी केंद्र-१ आणि दोन हजार ५३९ खाटांची क्षमता असलेली २० करोना काळजी केंद्रे-२ सुरू आहेत. या दोनही केंद्रांमध्ये अनुक्रमे ३९६ व २३६ रुग्ण दाखल आहेत. सध्या १३ हजार ८९८ खाटांची क्षमता असलेल्या करोना समर्पित केंद्रांमध्ये तीन हजार ७०८ रुग्ण आहेत. अतिदक्षता विभागाची सुविधा असलेल्या सुमारे एक हजार ८८६ खाटा उपलब्ध असून तेथे ८३४ रुग्ण आहेत. प्राणवायूची व्यवस्था असलेल्या आठ हजार ३१६ खाटा उपलब्ध असून तेथे एक हजार ९९१ रुग्ण आहेत. सुमारे एक हजार १३७ व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध असून तेथे ५७१ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची संख्या लक्षात घेता यापैकी काही केंद्रे बंद करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र आता नवकरोनामुळे प्रशासनाने ही केंद्रे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नवकरोनामुळे रुग्णसंख्या वाढल्यास पूर्वी बंद केलेली काही केंद्रे तात्काळ सुरू करण्याची तयारी पालिकेने ठेवल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकऱ्याने सांगितले.
आर्थिक भार.. : पालिकेकडे मनुष्यबळाचा तुटवडा असल्यामुळे डॉक्टर्स, परिचारिका, कक्ष परिचर आणि आवश्यक त्या कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही पालिकेला मोठा निधी खर्च करावा लागत आहे. काही केंद्रे बंद केली असती तर निधीची बचत होऊ शकली असती. परंतु करोनाबाधितांची संख्या अचानक वाढली तर मनुष्यबळ गोळा करताना पुन्हा त्रास होईल. त्यामुळे तूर्तास केंद्रे बंद करता येणार नाहीत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

नवकरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आलेल्या प्रवाशांवर पालिका बारीक लक्ष ठेवत आहे. या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे. पण भविष्यात रुग्णसंख्या वाढली तर त्यांची व्यवस्था करावी लागेल. त्यामुळे तूर्तास कार्यान्वित केंद्रे सुरूच ठेवण्यात येणार आहेत. भविष्यात आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेण्यात येईल.  – सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त