योग्य आणि वेळेत उपचार मिळत असल्याचा परिणाम

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : शहरात दरदिवशी एक हजाराहून अधिक नव्या करोना रुग्णांची भर पडत असली तरी मृत्युदरातील घट कायम आहे. मुंबईचा मृत्युदर साडेतीन टक्क्यांपेक्षाही खाली असून आठवडय़ाचा मृत्युदर ०.४१ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

मुंबईत जुलै, ऑगस्टमध्ये दरदिवशी सरासरी १ हजार रुग्णांचे नव्याने निदान केले जात होते. त्यावेळी मृत्युदर मात्र पाच ते सहा टक्के होता. त्यानंतर तो उत्तरोत्तर कमी झाला. फेब्रुवारीपासून पुन्हा मुंबईतील रुग्णसंख्या वाढू लागली आणि मार्चच्या पहिल्या आठवडय़ात पुन्हा दरदिवशी सरासरी १ हजार रुग्ण नव्याने नोंदले गेले. परंतु मृत्युदरात घट झाल्याचे दिसत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात ३.६४ टक्क्यांवर असलेला मृत्युदर मार्चच्या पहिल्या आठवडय़ात ३.४६ पर्यंत कमी झाला आहे.

दर आठवडय़ाच्या मृत्युदराचा विचार केला तर तो जुलैमध्ये चार ते पाच टक्के होता. परंतु यात उत्तरोत्तर घट होत फेब्रुवारीपासून एक टक्क्यापेक्षाही कमी झाला आहे. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात मृत्युदर ०.४१ नोंदवला गेला.

उपचार निश्चितीचा परिणाम

वर्षभराच्या अनुभवानंतर रुग्णाला कोणत्या वेळी कोणते औषध द्यायचे याबाबत पूर्वीसारखी साशंकता उरलेली नाही. ठोस औषध उपलब्ध नसले तरी उपचारांची दिशा मिळालेली आहे. तसेच लक्षणे दिसल्यास लगेच तपासण्या करून लक्षणे तीव्र होण्याआधी रुग्ण दाखल होतात. त्यामुळे उपचारही वेळेत होत असल्याने मृत्युदरातील घट कायम राहिली आहे आणि हे आश्वासक चित्र असल्याचे मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

राज्याचा मृत्युदर वाढत आहे. मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असूनही मृत्युदर वाढलेला नाही. उपचार देण्याबाबत डॉक्टरांना आलेल्या अनुभवामुळे सहव्याधी किंवा कृत्रिम श्वसनयंत्रणेवरील रुग्णही बरे होत आहेत. दुसरीकडे लोकांमध्ये आजाराबाबतची जागरुकता निर्माण झाल्याने रुग्ण वेळेत उपचारासाठी दाखल होण्यास तयार होत आहेत, हे ही महत्त्वाचे कारण आहे, असे फोर्टिस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

रुग्णांचे प्रमाण ५ टक्केच

मुंबईत करोनाने थैमान घातले होते, त्यावेळी  बाधितांचे प्रमाण चाचण्यांच्या तुलनेत २० टक्के होते. गेल्या काही दिवसांत पुन्हा रुग्ण वाढल्याचे दिसून येते. मात्र तरीही बाधितांचे प्रमाण ५ टक्क्यांहून अधिक वाढले नसल्याने त्या तुलनेत संसर्ग प्रसार वाढला आहे, असे म्हणता येणार नाही. बाधितांचे प्रमाण वाढू नये यासाठी मोठय़ा प्रमाणात चाचण्या करून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे गरजेचे आहे, असे करोना कृती दलाचे सदस्य डॉ शशांक जोशी यांनी सांगितले.

बाधितांचे प्रमाण

सरासरी चाचण्या       बाधितांचे प्रमाण   सरासरी संख्या

फेब्रुवारी

पहिल्या आठवडा        १५ हजार               २ टक्के                      ४००

मार्च

पहिल्या आठवडा      २० हजार                  ५ टक्के                   १ हजार