मुंबई: मुंबईतील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी बाधितांचे प्रमाण दुप्पट होण्याचा कालावधी आता १३ वरून १६ दिवसांवर आला आहे. वरळी, प्रभादेवी, धारावी, मानखुर्द, देवनारमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी २० दिवसांवर गेला आहे.

आजपर्यंत सुमारे ४३ टक्के रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्याबरोबर मुंबईत बाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून १३ वरून आता १६ दिवस इतका झाला आहे. म्हणजेच रुग्ण वाढण्याचा वेग मंदावतो आहे.

दादर, माहीम, धारावीमध्ये ५८ टक्के रुग्ण करोनामुक्त

दादर, माहीम, धारावी परिसर असलेला जी उत्तर या भागातील ५८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. या भागात २९०० रुग्ण बाधित आहेत, त्यापैकी फक्त धारावीतच १७३३ रुग्ण आहेत. जी उत्तरमधील एकूण रुग्णांपैकी १७०८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यापाठोपाठ कुल्र्यामध्ये २४९५ पैकी १०५८ रुग्ण बरे झाले. तर अंधेरी, विलेपार्ले २२१० रुग्णांपैकी १००४ रुग्ण बरे झाले.

अत्यावश्यक सेवेतील बाधितांचा आकडा वाढला

माहीमधील रुग्णांची संख्या ४८४ झाली आहे. यात रहेजा रुग्णालय, ब्रीच कॅण्डी रुग्णालय अशा ठिकाणी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच माहीम पोलीस वसाहतीत मोठय़ा प्रमाणावर बाधित रुग्ण आहेत. मात्र त्याचा निवासाचा पत्ता माहीमचा असल्यामुळे रुग्णांचा आकडा वाढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ठाणे महापालिकेच्या उपकर निरीक्षकाचा करोनामुळे मृत्यू

ठाणे महापालिकेच्या एका उपकर निरीक्षकाचा शनिवारी करोनामुळे मृत्यू झाला. हा उपकर निरीक्षक ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होता. गेल्या वर्षी ठाणे महापालिकेच्या मानपाडा-माजिवडा प्रभाग समितीने शहरातील सर्वात जास्त कर संकलित केला होता.