मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद

मुंबई : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनास कामाला लावल्यानंतर आता आता मुख्यमंत्रीही मैदानात उतरले असून राज्यभरातील डॉक्टरांशी थेट संवाद साधत करोनाची लाट रोखण्यासाठी ‘माझा डॉक्टर’ बनून मैदानात उतरण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांच्या या अभिनव उपक्रमास वैद्यकीय क्षेत्राकडूनही उत्स्फू र्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी अशाच प्रकारे आयोजित एका कार्यक्रमात मुंबईतील ७०० डॉक्टर्सनी करोना रोखण्यासाठी मैदानात उतरण्याची ग्वाही दिली.

राज्यभरातील खासगी डॉक्टरांशी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून संवाद साधण्याची संकल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. त्यानुसार राज्याच्या करोना नियंत्रणासाठीच्या राज्य कृती गटातील तज्ज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे ७०० खासगी डॉक्टर्सना करोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाच वेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले. विशेष म्हणजे तीन-चार  दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने मुंबईतील सुमारे ३०० डॉक्टर्सशी संवाद साधण्यात आला होता. अशाच रीतीने राज्यातील इतर विभागातील डॉक्टर्सशीदेखील संवाद साधण्यात येणार आहे.

डॉक्टरांशी संवाद साधताना प्रारंभीच बोलताना मुख्यमंत्र्यांनी करोना प्रतिबंधात वैद्यकीय क्षेत्र करीत असलेल्या लढाईसाठी त्यांची प्रशंसा केली तसेच येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. करोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्वाची आहे. कारण कोणत्याही लहान-मोठय़ा आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण माझा डॉक्टर बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार असल्याचे ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

लक्षणे नसलेले रुग्ण रुग्णालयात जातात आणि आवश्यक नसतानाही त्यांना खाटा उपलब्ध करून दिल्या जातात. गरजू रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. त्याचप्रमाणे करोना रुग्ण उशिराने दवाखान्यात जात असल्याने योग्य उपचारांना उशीर होतो, त्यामुळे फॅमिली डॉक्टर्सनी काळजीपूर्वक तपासणी करताना करोनाची लक्षणे ओळखून त्याप्रमाणे तत्काळ उपचार सुरू केल्यास वेळीच रुग्ण बरा होण्यास मदत होईल. घरच्या घरी विलगीकरणातील रुग्णांकडे सर्व डॉक्टर्सनी लक्ष देणे, त्यांची विचारपूस करीत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे रुग्णाला मानसिक आधारही मिळतो आणि त्याची तब्येत खालावत असेल तर वेळीच त्याला रुग्णालयात दाखल करणे शक्य होते असेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच आपल्या परिसरातील करोना उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांनादेखील आपल्या सेवेची गरज आहे हे लक्षात ठेवून खासगी डॉक्टर्सनी तिथेही आपली नावे नोंदवावीत असे आवाहनही ठाकरे यांनी के ले.

राज्यात १२७० मेट्रिक टन प्राणवायू निर्माण केला जातो मात्र करोनामुळे सध्या १७०० मेट्रिक टनापर्यंत आपली गरज वाढली आहे. आपण प्राणवायूच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनण्यासाठी कमी आणि दीर्घ कालासाठीचा आराखडा तयार केला असून त्यामुळे लवकरच राज्यांतर्गत प्राणवायूची वाढीव निर्मिती शक्य होईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

कृतीगटाकडून शंकांचे निरसन

या वेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, कृती गटाचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित तसेच डॉ. तात्याराव लहाने यांनी करोना काळातल्या उपचार पद्धतीवर डॉक्टर्सना मार्गदर्शन केले व त्यांच्या शंकांचे निरसन केले.

स्टीरॉइड्सचा वापर किती प्रमाणात करावा, सहा मिनिटे वॉक टेस्टचे महत्त्व, प्राणवायूची गरज आहे ते नेमके कसे ओळखावे, बुरशीमुळे होणाऱ्या ‘म्यूकर मायकॉसिस‘मध्ये काय उपचार करावेत,  प्राणवायूची पातळी धोकादायक स्थितीत आहे म्हणजे नेमके काय, रेमडेसिविर कधी आणि किती वापरावे, व्हेिंटलेटरवरील रुग्णांची काळजी, रक्तशर्करा स्थिर राहण्याकडे कसे लक्ष द्यावे, करोना झाल्यानंतरचा किती काळ देखरेख ठेवावी, करोना झालेल्या रुग्णाने नेमकी कधी लस घ्यावी यावर मोलाचे मार्गदर्शन व शंका निरसन केले. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात ठेवून लहान मुलांच्या वर्तणुकीतील बदल, त्यांना होणारी सर्दी, ताप, डायरिया, दूध व अन्न खाणे कमी करणे किंवा बंद होणे अशा लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही सांगण्यात आले.