News Flash

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी नेमकी कधीपर्यंत बंद राहणार?; ठाकरे सरकारने दिलं उत्तर

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार?

करोना संपेपपर्यंत सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची वाट पहावी लागणार आहे

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला असून सर्वसामान्यांवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्यानंतर राज्य सरकारकडून पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकलचे दरवाजे अजून पुढील १५ दिवसांसाठी उघडले जाणार नाहीत अशी शक्यता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“लोकल ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नाही. त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु राहतील,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी करोना रुग्णसंख्या खालावत असलेल्या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती दिली आहे. “राज्य सरकार १ जूननंतर रेड झोनच्या बाहेर असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये काही निर्बंध शिथील करण्यासंबंधी विचार करत आहे. सध्या ३६ पैकी १५ जिल्हे रेड झोनमध्ये असून तिथे निर्बंध अजून कठोर केले जाऊ शकतात,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन; अशी आहे ठाकरे सरकारची योजना

बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदूर्ग, सोलापूर, अकोला. सातारा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णसंख्या जास्त असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.

लॉकडाउनचे निर्बंध शिथील केले जावेत अशी मोठ्या प्रमाणात मागणी होत असून सरकार निर्णय जाहीर करण्याआधी पुढील चार ते पाच दिवस परिस्थितीची पाहणी करणार आहे असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्यानंतर राज्यात एप्रिल महिन्यापासून निर्बंध लावण्यात आले आहेत. सोमवारी राज्यात करोनाचे २२ हजार १२२ नवे रुग्ण आढळले असून ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 8:44 am

Web Title: covid 19 maharashtra minister vijay vadettiwar on mumbai local sgy 87
Next Stories
1 चक्रीवादळात पडलेल्या वृक्षांचे पुनर्रोपण
2 लसीकरणाचा वेग मंदावला
3 रहिवाशांचा विरोध कायम
Just Now!
X