७८९८ नवीन रुग्ण, २६ मृत्यू; बाधितांचे प्रमाण १६.०१ टक्के

मुंबई : मुंबईतील बाधितांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून घटत आहे. तर दैनंदिन रुग्णांची संख्याही घटू लागली आहे. रुग्णदुपटीचा कालावधीही एक एक दिवसाने वाढू लागला आहे. त्यातून करोनामुक्त रुग्णांची संख्या दैनंदिन रुग्णांपेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे. मंगळवारी ७८९८ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ११,२६३ रुग्ण करोनामुक्त झाले. दिवसभरात ४९ हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १६ टक्के  नागरिक बाधित आढळले. दरम्यान, मंगळवारी २६ रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झाली.

मुंबईत मंगळवारी ७८९८ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर २६ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची संख्या गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत कमी झाली आहे. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या पाच लाख ३५ हजारापुढे गेली आहे. एका दिवसात ११,२६३ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत चार लाख ३४ हजार ९४१ म्हणजेच ८१ टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त रुग्णांची संख्या  फेब्रुवारीत ९४ टक्क्यांवर होती. मात्र रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे हा दरही ७९ टक्क्यांपर्यंत कमी झाला होता. हा दर किं चित वाढून ८१ टक्के झाला आहे. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही आता कमी होऊ लागली आहे. ही संख्या ९२ हजारापुढे गेली होती. ती मंगळवारी आणखी कमी होऊन ८६,८६६ झाली आहे. त्यापैकी ८१ टक्के म्हणजेच ७३ हजार ३७१ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर १७ टक्के म्हणजेच १५,५८२ रुग्णांना लक्षणे आहेत. गंभीर रुग्णांची संख्या १,३१४ झाली आहे.

करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. सोमवारी ४९ हजार ३२० चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांपैकी १६.०१ टक्के नागरिक बाधित आहेत. या चाचण्यांपैकी २२,५०० प्रतिजन चाचण्या आहेत. तर २६,८०० आरटीपीसीआर चाचण्या आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांमधील बाधितांचे प्रमाण २० टक्क्यांहून जास्त आहे.  तर प्रतिजन चाचण्यांमधील बाधितांचे प्रमाण १० टक्के आहे. आतापर्यंत ४६ लाख ९९ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

सोमवारी २६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यात १७ पुरुष व ९ महिलांचा समावेश होता. २३ मृतांचे वय ६० वर्षांवरील होते. तर १५ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. ३ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.  मृतांची एकूण संख्या १२ हजार ०८६ झाली आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर रोज वाढत असला तरी तो या आठवडय़ात काहीसा कमी झाला आहे. सध्या हा दर १.७९ टक्के आहे. तो गेल्या आठवडय़ात दोन टक्के होता. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधीही ३४ दिवसांवरून ३८ दिवसांपर्यंत वाढला आहे.  मुंबईत रुग्णांच्या संपर्कातील ५१ हजार नागरिकांचा शोध रविवारी घेण्यात आला. त्यापैकी ३७ हजाराहून अधिक नागरिक हे अतिजोखमीच्या गटातील आहेत. तर १४ हजाराहून अधिक नागरिक हे कमी जोखमीच्या गटातील आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात पाच हजार ५६ करोना रुग्ण ; २७ जणांचा मृत्यू

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात मंगळवारी ५ हजार ५६ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर २७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. गेल्या चार ते पाच महिन्यांतील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची ही उच्चांक नोंद आहे. सर्वाधिक मृत्यू हे ठाणे शहरात झाले असून त्यांची संख्या आठ इतकी आहे. जिल्ह्य़ातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३ लाख ९० हजार १२४ इतकी झाली असून मृतांची संख्या ६ हजार ७६० इतकी झाली आहे.  जिल्ह्य़ातील ५ हजार ५६ करोनाबाधितांपैकी ठाणे महापालिका क्षेत्रात १ हजार ५३३, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात १ हजार १८८, नवी मुंबई १ हजार ३४, मीरा भाईंदर ४६२, अंबरनाथ ३५३, बदलापूर १८५, उल्हासनगर १५९, भिवंडी ८६ आणि ठाणे ग्रामीण क्षेत्रात ५६ रुग्ण आढळून आले. तर २७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांतील मृतांची ही उच्चांक नोंद आहे. त्यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात आठ, मीरा भाईंदर सहा, नवी मुंबई पाच, कल्याण चार, उल्हासनगर दोन आणि बदलापूर येथील दोन जणांचा समावेश आहे.