दावा सिद्ध करण्यासाठी आकडेवारीचा आधार; ९१२ व्यक्तींच्या नमुन्यांपैकी पाच व्यक्ती बाधित

मुंबई : ज्या भागात करोनाबाधितांचे प्रमाण अधिक आहे, अशा भागांत पालिकेने सुरू केलेल्या खास दवाखान्यांमध्ये आतापर्यंत ३ हजार ५८५ व्यक्तींची करोनाविषयक प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ९१२ व्यक्तींचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्यानंतर केवळ ५ व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मुंबईत समूह संसर्ग झाला नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.

मुंबईत ज्या भागांत करोनाचे जास्त रुग्ण आढळून आले आहेत, अशा प्रतिबंधित भागांमध्ये किंवा त्यालगतच्या परिसरात महापालिकेने खास दवाखाने सुरू केले आहेत. या दवाखान्यांमध्ये बाधित रुग्णांच्या इमारतीत किंवा लगतच्या परिसरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. महापालिकेने असे ९७ दवाखाने सुरू केले आहेत. तिथे आजपर्यंत ३ हजार ५८५ व्यक्तींची करोनाविषयक प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यापैकी ज्या लोकांमध्ये लक्षणे आढळली अशा ९१२ व्यक्तींचे नमुने  तपासणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्यानंतर ५ व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले आहे. या पाच व्यक्तींपैकी काहींनी परदेश प्रवास केला होता तर काही रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील होते.

करोनाचा बाधित व्यक्तीचे निदान लवकरात लवकर झाल्यास त्याच्यापासून होणारा संसर्ग रोखता येतो. त्यामुळे संसर्ग अधिक वाढू नये म्हणून पालिकेने रुग्णांचा शोध घेण्याची मोहीम राबवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अधिक तीव्रता असलेल्या दाटीवाटीच्या किंवा झोपडपट्टीच्या भागांमध्ये हे तात्पुरते दवाखाने सुरू करण्यात आले आहेत.

०.५४ टक्के बाधित

खास दवाखान्यांमध्ये तपासणी करण्यात आलेल्या ९१२ नमुन्यांपैकी ५ व्यक्तींचे नमुने बाधित आढळून आले. याचाच अर्थ ०.५४ टक्के अर्थात सुमारे अर्धा टक्के लोक बाधित आढळून आले. बाधित व्यक्तींची ही आकडेवारी पाहता मुंबईत समूह संसर्ग झाला नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

हेल्पलाइनची सुविधा

ज्या व्यक्तींना कफ, सर्दी, खोकला, ताप, श्वास घेताना त्रास होणे, अशी लक्षणे जाणवत असतील त्यांना दूरध्वनीद्वारे व घरबसल्या महापालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन प्राप्त करून घेता यावे, याकरिता हेल्पलाइनची सुविधा महापालिकेने सुरू केली आहे. याअंतर्गत दूरध्वनी क्रमांक ०२०-४७०८५०८५ यावर सकाळी १० ते सायंकाळी ७ या कालावधीदरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन नागरिकांना घेता येत आहे.