राज्यातील रुग्णसंख्येतही मोठी घट

मुंबई : मुंबई, ठाण्यासह राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत मंगळवारी मोठी घट नोंदविण्यात आली. दिवसभरात राज्यात ५१,८८० नवे रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील २,५५४ आणि ठाणे जिल्ह्यातील २,१९० रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यात दिवसभरात ८९१ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात दिवसभरात तीन लाख नमुने तपासल्यावर ५१,८८० नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवडय़ात एवढय़ाच चाचण्या के ल्यानंतर सरासरी ६५ हजार रुग्णांची नोंद झाली होती. या तुलनेत गेल्या २४ तासांतील रुग्णसंख्या कमी आहे.

मुंबईत मंगळवारी २९ हजार ७६ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांची संख्या जवळपास ५ हजारांनी वाढली तरी रुग्णसंख्या मात्र कमी झाली आहे. मुंबईत मंगळवारी दोन हजार ५५४ नवे रुग्ण आढळले. बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीपेक्षा अधिक असून, पाच हजार २४० रुग्ण मंगळवारी करोनामुक्त झाले.

ठाणे जिल्ह्य़ात मंगळवारी २ हजार १९० करोनाबाधित आढळले, तर ५२ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्य़ातील २ हजार १९० करोनाबाधितांपैकी कल्याण -डोंबिवली ५६८, ठाणे ५५२, नवी मुंबई ३२६, ठाणे ग्रामीण २४०, मिरा भाईंदर २१६, बदलापूर ११९, अंबरनाथ ७५  रुग्ण आढळले.

देशात पंधरा दिवसांत ५० लाख रुग्णांची भर

नवी दिल्ली : देशात सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी दैनंदिन रुग्णसंख्येत अंशत: घट नोंदविण्यात आली. मात्र, गेल्या १५ दिवसांत रुग्णसंख्येत तब्बल ५० लाखांची भर पडल्याने देशाच्या एकूण रुग्णसंख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. देशात गेल्या २४ तासांत ३,५७,२२९ रुग्ण आढळले, तर ३४४९ रुग्णांचा मृत्यू झाला.