मुंबई : मुंबईमधील करोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सरासरी ८९ दिवसांवर पोहोचला असून, शनिवारी एक हजार ३०४ जणांना करोनाची बाधा झाली. दिवसभरात ५८ रुग्णांचा मृत्यू झाला, तर एक हजार ४५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले.मुंबईतील एकूण रुग्णसंख्या एक लाख २२ हजार ३३१ वर पोहोचली आहे. मात्र त्यापैकी ९५ हजार ३५४ रुग्ण बरे झाले आहेत. करोनामुळे आतापर्यंत सहा हजार ७४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला १९ हजार ९३२ उपचाराधीन रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

करोना रुग्ण सापडल्यामुळे मुंबईत ५८२ प्रतिबंधित क्षेत्रे असून पाच हजार ३९६ इमारती टाळेबंद आहेत.

देशात १९६ डॉक्टरांचा करोनामुळे मृत्यू

देशात करोनाविरोधातील लढय़ात १९६ डॉक्टरांचा मृत्यू झाला असून यातील बहुतांश सामान्य चिकित्सक (जनरल प्रॅक्टिशनर) आहेत. यासंदर्भात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए)ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून डॉक्टरांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याबाबत लक्ष देण्याची विनंती केली आहे.